गडचिरोली पोलीस दलामार्फत आत्मसमर्पीतांच्या नवजीवन वसाहतीत उद्यान व गोटूल उद्घाटन कार्यक्रम संपन्न
- घरकुल गृहप्रवेश सोहळा
- आत्मसमर्पीतांना समर्पत कल्याण कार्ड, ई- श्रम कार्ड व आरोग्य कार्ड वाटप
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हा पोलीस दलासमोर आत्मसमर्पीत होवुन मुख्यप्रवाहात आलेल्या नक्षल सदस्यांचे जलद गतीने पुनर्वसन व रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव प्रयत्नशिल असून त्याचाच एक भाग म्हणून पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचे संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद (भा.प्र.से.) जि. प. गडचिरोली यांचे योगदानातून आत्मसमर्पीतांच्या नवजीवन वसाहतीत उभारण्यात आलेल्या गोटुल व घरकुलचा गोटुल उद्घाटन व घरकुल गृहप्रवेश सोहळा ०८ ऑक्टोबर २०२२ रोजी पार पाडण्यात आला.
यावेळी मोठया संख्येने आत्मसमर्पीत नक्षल सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी त्यांना समर्पीत कल्याण कार्ड, ई श्रम कार्ड, आरोग्य कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच ज्या सदस्यांच्या घरकुलाचे बांधकाम पूर्ण झालेले आहे, त्यांनी आपल्या नवीन घरकुलात गृहप्रवेश केला. यावेळी मार्गदर्शन करतांना मा. पोलीस अधीक्षक सा. यांनी सांगितले की, नक्षलमध्ये भरती झाल्यावर तिथे तुम्हाला सांगतात की, समर्पित झाल्यास तुम्हाला शासन कसलीही मदत करत नाहीत, पण ते खोटे असून, आम्ही तुमच्यासाठी सर्वतोपरी मदत करतो. तुमच्या शिक्षण व आवडीनुसार आम्ही तुम्हाला मदत करीत आहोत. वाटप झालेल्या भूखंडावर जास्तीत जास्त घरे बांधण्यासाठी तसेच लाईट व पाण्याची व्यवस्था करून दिली आहे. दर महिन्याला विकासकामांचा आढावा घेणे सुरु आहे. तसेच इतर आत्मसमर्पितांसाठी सुध्दा पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने असे आश्वस्त करतो की, जे काही आम्हाला तुमच्यासाठी करणे शक्य आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न करीत आहोत. असे सांगितले.
आतापर्यंत ६५७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून, त्यांच्या पुनर्वसनाकरीता १४७ भुखंड वाटप करून घरकुलाचा लाभ देण्यात आला आहे. तसेच त्यांच्या मुलांना खेळण्याकरीता उद्यान तयार करण्यात आले असून, भारतातील पहीली पायाभूत सुविधा माऊली मंदीर मुर्तीस्थापना करण्यात आली आहे तसेच गोटुल (समाजमंदीर) चे बांधकाम करण्यात आले आहे. नवजीवन वसाहतीकरीता १५ लाख रु.चे अंतर्गत रस्ते, विद्युतीकरण, पाणी पुरवठा योजना, नाली बांधकाम इत्यादी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
तसेच आत्मसमर्पीतांना रोजगाराची संधी उपलब्ध होणेकरीता २ बचत गट स्थापन करून १२ सदस्यांना फ्लोअर क्लिनरचे प्रशिक्षण व २५ महीलांना लोणचे पापड तयार करण्याचे प्रशिक्षण, साचण तयार करण्याचे प्रशिक्षण, चारचाकी व दुचाकी वाहनचालक प्रशिक्षण व १३ सदस्यांना औदयोगिक प्रशिक्षण देण्यात आले. त्याचबरोबर न्युक्लिअस बजेट अंतर्गत ८६ सदस्यांना ५० हजार रु. ये अर्थसहाय्य व्यवसाय उभारण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आले. सद्या आत्मसमर्पीत सदस्यांचे २ बचत गट हे फ्लोअर क्लिनरच्या व्यवसायातून आत्मनिर्भर झाले आहेत. ११७ जात प्रमाणपत्र, रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ६९ जॉबकार्ड, ४२ सदस्यांचे ई-भ्रमकार्ड ३८ सदस्यांचे महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे कार्ड, ६४१ आधार कार्ड, १२७ पॅन कार्ड, १४८ राशन कार्ड, ११७ घरकुल वाटप, नवजीवन वसाहत येथे ३५० रोपांचे वृक्षारोपण, मत्स्यतलाव बांधकाम व शिक्षणाकरीता मुक्तविद्यापीठामध्ये पूर्वतयार कोर्सकरीता २७ सदस्यांचे प्रवेश करुन देण्यात आले.१६ आत्मसमर्षीतांचे सामुहीक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून लग्न करुन देण्यात आले असून, ३६ सदस्यांची नसबंदी रिओपनिंग करून देण्यात आली आहे. आरोग्य तपासणी शिबीराच्या माध्यमातून १२० आत्मसमर्पीतांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. त्यातील २० सदस्यांनी रक्तदान शिबीरात सहभागी होवून रक्तदान केले आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत पुनर्वसन निधी योजनेअंतर्गत आत्मसमर्पीतांच्या पुनर्वसनाकरीता १० कोटी रुपयेचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
यावेळी कार्यक्रमास पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन), समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) अनुज तारे, सुनिल दुर्गे सहाय्यक अभियंता जि. प. गडचिरोली हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आत्मसमर्पण शाखेचे प्रभारी अधिकारी गंगाधर ढगे व पोलीस अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.
News - Gadchiroli