महत्वाच्या बातम्या

 विद्यापीठ सांख्यिकी विभाग सुवर्ण महोत्सव उत्साहात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ पदव्युत्तर सांख्यिकी विभागाचा सुवर्ण महोत्सव सोहळा १६ ते १८ मार्च २०२६ या कालावधीत उत्साहात पार पडला. विद्यापीठ महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरातील सांख्यिकी विभागात आयोजित महोत्सवाला विद्यार्थी, प्राध्यापक तसेच शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

या महोत्सवाच्या निमित्ताने फ्राॅम आर्टिफिशियल इंटेलिजन्स टू अग्मेंटेड इंटेलिजन्स रिवायरींग दि मॅथेमॅटिकल माइंड फॉर ह्यूमन ग्रोथ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. मनाली मकरंद क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता महत्त्वाची असली तरी तिच्यावर पूर्णपणे अवलंबून राहू नये. त्याचा परिणाम मानवी सर्जनशीलतेवर होऊ शकतो.

एआयचा वापर हा मानवी क्षमतांचा विकास करण्यासाठी सहाय्यक साधन म्हणून करावा, पर्याय म्हणून नव्हे, असे त्यांनी सांगितले. चॅट जीपीटी सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या भूमिकेवर त्यांनी प्रकाश टाकला. 

प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले टीसीएस मिहानचे सेंटर हेड अरविंद कुमार यांनी आपल्या मनोगतात मानवी बुद्धिमत्ता कोणत्याही तंत्रज्ञानापेक्षा श्रेष्ठ असल्याचे नमूद केले. एआयचा प्रभावी वापर डेटा विश्लेषण, संशोधन व नवोन्मेषासाठी करावा आणि मानवी बुद्धिमत्ता व तंत्रज्ञान यांचा समन्वय साधून समाजाच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.

कार्यशाळेच्या प्रास्ताविकात गणित व सांख्यिकी विभाग प्रमुख प्रा. गणेश केदार यांनी कार्यशाळेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. आधुनिक शिक्षणात, विशेषतः गणित व सांख्यिकी अभ्यासक्रमात कृत्रिम बुद्धिमत्तेचे एकत्रीकरण किती महत्त्वाचे आहे, यावर भर दिला. या कार्यशाळेत मेघना मराठे, मनीषा जाधव, सौरभ कुलकर्णी, डॉ. सिद्धार्थ चौरसिया, डॉ. पाणिनी तेलंग आणि डॉ. प्रिती गोसावी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स, शिक्षणशास्त्र आणि संशोधन क्षेत्रातील विविध पैलूंवर मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून आयक्यूएसी संचालक डॉ. नंदकिशोर करडे होते. विद्यापीठ पदव्युत्तर विभागांमधील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत एम.एस्सी. अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठ विभागांची निवड करण्याचे आवाहन डॉ. नंदकिशोर करडे यांनी केले.

१८ मार्च २०२६ रोजी संलग्न महाविद्यालयांतील पदवी विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांचे उद्घाटन विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. उमेश पालिकुंडवार यांच्या हस्ते झाले. त्यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना स्वतःची प्रतिभा व संकल्पनात्मक आकलन सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळते, असे सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आयआयएल माजी संचालक डॉ. राजेश सिंग  उपस्थित होते. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानात सांख्यिकी ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. या प्रसंगी डॉ. मुक्ता देशपांडे यांनी सांख्यिकी विभागाच्या ५० वर्षांच्या वाटचालीचा आढावा सादर केला, तर डॉ. मंजिरी गजार्लावार यांनी आभार मानले. 

स्पर्धांमध्ये एकूण ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पोस्टर सादरीकरण स्पर्धेत शिवाजी सायन्स कॉलेजच्या कु. पायल गुप्ता यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर प्रेरणा कॉलेजच्या कु. पियुषी वहाणे आणि धरमपेठ सायन्स कॉलेजच्या कु. वेदांशी चाहांदे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. वक्तृत्व स्पर्धेत धरमपेठ सायन्स कॉलेजच्या कु. स्वरा आकांत विजयी ठरल्या, तर पॉवरपॉइंट सादरीकरण स्पर्धेत निवेश मेश्राम यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संजय ढोबळे उपस्थित होते. त्यांनी विजेत्यांचे अभिनंदन करून गणित व सांख्यिकी विभागांच्या संयुक्त उपक्रमाचे कौतुक केले.

डॉ. गणेश केदार यांनी सर्व मान्यवर, वक्ते, प्राध्यापक आणि सहभागी यांचे आभार मानून कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. चालू शैक्षणिक वर्षापासून गणित विभागात बी. एस्सी. सायबर सायन्स, बी.एस्सी. ड्रोन सायन्स आणि बी. एस्सी. (ऑनर्स) गणित हे उद्योगाभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असून त्यात डेटा सायन्स व एआय, सायबर सिक्युरिटी, फायनान्स व ॲक्च्युरियल सायन्स आणि SAP-ERP सिस्टम्स हे विशेष अभ्यासक्रम समाविष्ट असतील.

यासोबतच नियमित एम. एस्सी. गणित अभ्यासक्रम ही उपलब्ध असेल, असे सांगितले. सांख्यिकी विभागात एम. एस्सी. सांख्यिकी आणि एम. एस्सी. डेटा सायन्स हे अभ्यासक्रम विज्ञान व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या कार्यशाळेस विविध महाविद्यालये व विद्यापीठ विभागांमधील १७२ सहभागींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.





  Print






News - Nagpur




Related Photos