ट्रकला ओव्हरटेक करताना पिकअपची धडक : दुचाकीस्वार जागीच ठार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : भंडारा–तुमसर राष्ट्रीय मार्गावर शनिवारी ७ फेब्रुवारी सायंकाळी एक भीषण अपघात घडून २९ वर्षीय दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाची जोरदार धडक बसल्याने ही दुर्घटना मोहगाव (देवी) गावाजवळ सायंकाळी सुमारे ४ वाजताच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, दिगंबर तेजलाल तुरकर (वय २९) असे मृत तरुणाचे नाव असून तो गोंदिया जिल्ह्यातील डोंगरगाव (ता. गोंदिया) येथील रहिवासी होता. दिगंबर आपल्या दुचाकीने (एमएच ३१ / जीबी ५३७३) तुमसरकडून भंडाऱ्याकडे जात होता.
दरम्यान, मोहगाव देवी गावाजवळ एका ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाशी त्याची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दिगंबरचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
रियल इस्टेट व्यवसायासाठी नागपूरला निघाला होता -
मृत दिगंबर हा नागपूर येथील एका कंपनीशी संबंधित रियल इस्टेट क्षेत्रात कार्यरत होता. कामानिमित्त तो दुचाकीने नागपूरकडे निघाला होता. मात्र, प्रवासातच काळाने त्याच्यावर झडप घातली. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक वरठी पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे मन हेलावून गेले.
अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच वरठी पोलीस उपनिरीक्षक मस्के व सहकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह हटविला आणि पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास वरठी पोलीस करीत आहेत.
News - Bhandara




Petrol Price




