महत्वाच्या बातम्या

 पांढऱ्या सोन्याची कमाल! रेशीम शेतीतून सुवर्णमाला डफ यांना साडेचार लाखांचे उत्पन्न


- महिलांसाठी आर्थिक स्वावलंबनाचा प्रेरणादायी आदर्श

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : पारंपरिक शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने पर्यायी शेतीचा मार्ग स्वीकारत हिंगणघाट तालुक्यातील चिकमोह येथील सुवर्णमाला गिरीधर डफ यांनी रेशीम शेतीत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पहिल्याच वर्षात त्यांनी रेशीम कोष उत्पादनातून सुमारे ४ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले असून, ग्रामीण महिलांसाठी आर्थिक स्वावलंबनाचा प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

सुवर्णमाला डफ यांच्या कुटुंबाकडे अडीच एकर जमीन आहे. पारंपरिक पिकांमध्ये नैसर्गिक आपत्ती, बाजारभावातील अनिश्चितता आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे अपेक्षित आर्थिक फायदा होत नव्हता. मुलांचे उच्च शिक्षण सुरू असल्याने कुटुंबासमोर आर्थिक आव्हान होते. अशावेळी पुतण्या योगेश यांनी रेशीम उद्योगाची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी चिंचोली येथील प्रगतिशील रेशीम शेतकरी बळवंत घोटेकार यांच्या तुती बागेला व कीटक संगोपनगृहाला भेट देऊन प्रत्यक्ष माहिती घेतली.

जिल्हा रेशीम कार्यालय येथून मार्गदर्शन घेतल्यानंतर सन २०२४-२०२५ मध्ये त्यांनी ३० बाय ७० फुटांचे कीटक संगोपनगृह उभारून दोन एकर क्षेत्रावर तुती लागवड केली. मार्च २०२५ मध्ये १५० अंडीपुंजांची पहिली बॅच घेतली. त्यातून ९० किलो कोष उत्पादन होऊन ३० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर १५०, २०० आणि २५० अंडीपुंजांच्या बॅच घेत प्रत्येक बॅचमधून ९० हजार ते १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवले.

रेशीम कोषाची विक्री बीड, सिकंदराबाद तसेच सिदलघट्टा, बंगळुरू येथील बाजारपेठेत केली जाते. कोषाला ७५० ते ८५० रुपये प्रतिकिलोपर्यंत दर मिळत आहे. सध्या १५० अंडीपुंजांची बॅच सुरू असून त्यातून सुमारे २०० किलो कोष उत्पादनाची अपेक्षा आहे.

रेशीम विकास अधिकारी रजनी बन्सोड, समूह प्रमुख शुभम ताकोते आणि प्रगतिशील रेशीम शेतकरी बळवंत घोटेकार यांच्या मार्गदर्शनामुळे कीटक संगोपन, तुती बाग व्यवस्थापन, खत व्यवस्थापन व रोगप्रतिबंधक उपाययोजनांचे तांत्रिक ज्ञान डफ यांनी आत्मसात केले. सिल्क समग्र-२ योजनेअंतर्गत तुती लागवड, संगोपनगृह व कीटक संगोपन साहित्याकरिता ३ लाख ७५ हजार रुपयांचे अनुदान मिळाल्याने त्यांना आर्थिक आधार मिळाला. रेशीम शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे मुलांच्या उच्च शिक्षणाचा खर्च भागविण्यास मदत झाली असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे.

कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत रेशीम शेतीकडे जोडधंदा म्हणून पाहावे. महिलांनीही या व्यवसायात सहभागी होऊन कुटुंबाच्या उत्पन्नात भर घालावी, असे आवाहन सुवर्णमाला डफ यांनी केले आहे. मेहनत, योग्य नियोजन आणि शासकीय मार्गदर्शनाच्या बळावर रेशीम शेतीत मिळवलेले सुवर्णमाला डफ यांचे यश ग्रामीण भागातील महिला व शेतकऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.





  Print






Related Photos