मोहटोला परिसरात बिबट्याचा संचार : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

- लोहारा, करपडा, कुकडी व विहीरगाव शिवारात बिबट्याचे दर्शन; वनविभागाने गस्त वाढविण्याची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : तालुक्यातील मोहटोला परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोहारा, करपडा, कुकडी आणि विहीरगाव या गावांच्या शिवारात बिबट्या फिरत असल्याचे दिसून आले असून, रात्रीच्या वेळी या भागातून प्रवास करणाऱ्या अनेक नागरिकांना त्याचे दर्शन झाले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी, शेतमजूर आणि प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
सध्या परिसरात धान कापणी व मळणीची कामे सुरू असून रब्बी हंगामातील पेरणीची लगबगही वाढली आहे. त्यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांना पहाटेपासून तसेच सायंकाळच्या वेळी शेतात जावे लागत आहे. अशा परिस्थितीत शेतशिवारात बिबट्याचा वावर असल्याने शेतात काम करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दुसरीकडे, वैरागड-रांगी हा मार्ग वर्दळीचा असल्याने या रस्त्यावरून रात्री-अपरात्री पादचारी व दुचाकीस्वारांची ये-जा सुरू असते. अशा वेळी अचानक बिबट्याचा सामना झाल्यास नागरिकांवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रात्रीच्या प्रवासादरम्यान विशेष खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे, महिनाभरापूर्वीही याच बिबट्याचे शेतशिवारात अनेक शेतकऱ्यांना दर्शन झाले होते. त्यावेळी वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, पुन्हा एकदा बिबट्याचा वावर वाढल्याचे दिसून येत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.
या पार्श्वभूमीवर वनविभागाने मोहटोला परिसरासह लोहारा, करपडा, कुकडी आणि विहीरगाव शिवारात तातडीने गस्त वाढवावी, बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.




Petrol Price




