महत्वाच्या बातम्या

 चंद्रपुरात महाराष्ट्रातील पहिला २५१ कुंडीय गायत्री महायज्ञ : ९ ते १२ जानेवारीदरम्यान भव्य आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : राष्ट्रनिर्माण, संस्कारसंवर्धन आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश देण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून चंद्रपुरात महाराष्ट्रातील पहिल्या २५१ कुंडीय गायत्री महायज्ञाचे आयोजन करण्यात येत आहे. ‘राष्ट्र शौर्य समृद्धी २५१ कुंडीय गायत्री महायज्ञ व व्यसनमुक्ती संकल्प सोहळा’ ९ ते १२ जानेवारी २०२७ या कालावधीत पार पडणार आहे. या माध्यमातून राष्ट्रजागरण, युवा पिढीमध्ये संस्कारांची रुजवण, आध्यात्मिक चेतना आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीचा संदेश दिला जाणार आहे.

या महायज्ञाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून रविवार, २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता श्री वेदमाता गायत्री शक्तिपीठ, श्रीराम सेतू मार्ग, दाताळा येथे भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शांतिकुंज, हरिद्वार येथील गायत्री तीर्थाचे व्यवस्थापक योगेंद्रजी गिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार असून, आमदार सुधीर मुनगंटीवार आणि सपनाताई मुनगंटीवार यांचीही उपस्थिती राहणार आहे. महायज्ञाच्या निमित्ताने निबंध आणि घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा २१ डिसेंबर रोजी गांधी चौकातील महानगरपालिका मैदानावर होणार आहे. निबंध स्पर्धेतील २० गुणवंत विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चहापान आणि संवाद साधण्याची विशेष संधी मिळणार आहे. युवकांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक जाणीव आणि सकारात्मक विचार रुजविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

९ जानेवारी रोजी भव्य मंगल कलश यात्रेने महायज्ञाच्या कार्यक्रमांना सुरुवात होईल. १० ते १२ जानेवारीदरम्यान २५१ कुंडीय गायत्री महायज्ञ संपन्न होणार आहे. या चार दिवसांत विशाल पुस्तक व चित्र प्रदर्शन तसेच व्यसनमुक्ती प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. १० जानेवारीला गोसंवर्धन प्रदर्शन आणि कृषी संमेलन, ११ जानेवारीला नारी जागरण संमेलन व दीप महायज्ञ, तर १२ जानेवारीला राज्यस्तरीय युवा संमेलन आयोजित करण्यात आले आहे. अखिल विश्व गायत्री परिवार, चंद्रपूर यांच्या आयोजनातून आणि आमदार सुधीर मुनगंटीवार व सपनाताई मुनगंटीवार यांच्या संयोजनातून हा महायज्ञ साकारत आहे. आध्यात्मिक साधनेसोबतच व्यसनमुक्ती, गोसंवर्धन, कृषी विकास, महिला सक्षमीकरण आणि युवा प्रबोधन असे विविध विषय या सोहळ्याच्या माध्यमातून हाताळले जाणार आहेत. त्यामुळे हा उपक्रम धार्मिक आयोजनापुरता मर्यादित न राहता सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्रजागरणाचे व्यासपीठ ठरणार आहे.

या महायज्ञासाठी देशाच्या विविध भागांतून भाविक, गायत्री परिवाराचे साधक आणि नागरिक मोठ्या संख्येने चंद्रपुरात येण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्रात प्रथमच अशा स्वरूपाचा २५१ कुंडीय गायत्री महायज्ञ आयोजित होत असल्याने चंद्रपूर जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे. या महायज्ञाच्या भूमिपूजन सोहळ्यासह मुख्य कार्यक्रमात नागरिकांनी सहकुटुंब मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.





  Print






Related Photos