महत्वाच्या बातम्या

 बारावी निकालात गोंदिया जिल्ह्याची पुन्हा बाजी : सलग दुसऱ्या वर्षी नागपूर विभागात अव्वल


- तिरोडा तालुका जिल्ह्यात टॉप; मुलींचा निकाल मुलांपेक्षा सरस

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी (५ मे) जाहीर झाला. यंदाही गोंदिया जिल्ह्याने उत्तुंग कामगिरी करत सलग दुसऱ्या वर्षी नागपूर विभागात अव्वल स्थान पटकावले आहे. यंदा जिल्ह्याचा एकूण निकाल ९४.०४% इतका लागला असून, मागील वर्षाच्या तुलनेत तो १ टक्क्यांनी कमी असला, तरीही जिल्ह्याने आपले अग्रस्थान कायम राखले आहे.

फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेल्या परीक्षेसाठी १७ हजार ९८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १७ हजार ९०८ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले. त्यामधून १६ हजार ८४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या निकालातही मुलींनी मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. ९ हजार २१४ मुलांमध्ये ८ हजार ४५६ उत्तीर्ण (९१.७७%) झाले तर ८ हजार ६९४ विद्यार्थिनींपैकी ८ हजार ३८५ जणांनी यश मिळवले असून त्यांची उत्तीर्णता टक्केवारी ९६.४४% इतकी आहे.

गोंदिया जिल्ह्यात ग्रामीण भागातील शाळांचा निकाल शहरी भागापेक्षा अधिक चांगला लागल्याचे चित्र यंदाही पाहायला मिळाले.विशेषतः तिरोडा तालुका निकालाच्या बाबतीत जिल्ह्यात सर्वोच्च ठरला असून त्याचा निकाल ९७.२१% आहे.

तालुकानिहाय निकाल पुढीलप्रमाणे आहे -

तिरोडा – ९७.२१%, अर्जुनी मोरगाव – ९६.९८%, सालेकसा – ९५.६१%, गोंदिया – ९४.४२%, देवरी – ९३.८८%, आमगाव – ९२.०९%, गोरेगाव – ९१.६०%, सडक अर्जुनी – ८६.५१%

एकूणच जिल्ह्यातील गुणवत्तेचा आलेख हा समाधानकारक असून, विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक, शाळा प्रशासन यांनी यामागे महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. जिल्ह्याच्या यशामुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे.





  Print






News - Gondia




Related Photos