महत्वाच्या बातम्या

 नागभीड कृषी उत्पन्न बाजार समितीत आगीचा तांडव : ६ हजार २८० पोती धान जळून खाक, साडेतीन कोटींच्या नुकसानीचा अंदाज


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : नागभीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत तब्बल ६ हजार २८० पोती धान जळून खाक झाले. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात बारदान्याचेही नुकसान झाले असून, गोदामाला आगीची झळ बसली आहे. या आगीत सुमारे ३ ते साडेतीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आगीची माहिती मिळताच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीची तीव्रता लक्षात घेता नागभीड, सिंदेवाही आणि ब्रह्मपुरी येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

या आगीत ६ हजार २८० पोती धान जळून खाक झाले असून, त्याचे एकूण वजन ५ हजार ३४० क्विंटल आहे. जळालेल्या धानाची अंदाजित किंमत १ कोटी ८६ लाख रुपये असल्याची माहिती आहे. याशिवाय नवीन आणि जुना बारदाना मिळून सुमारे २१६ गठ्ठे आगीत जळाले. यामध्ये जवळपास १ लाख ७ हजार जूट बारदान्याचा समावेश आहे.

धान आणि बारदान्याच्या नुकसानीसोबतच गोदामाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचा विचार करता आर्थिक हानीचा आकडा ३ ते साडेतीन कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अधिकृत पंचनामा आणि तपासणीनंतर नुकसानीचा अंतिम आकडा समोर येणार आहे. या घटनेमुळे नागभीड कृषी उत्पन्न बाजार समितीचे मोठे नुकसान झाले असून, परिसरात खळबळ उडाली आहे.






  Print






Related Photos