महत्वाच्या बातम्या

 भरडाईसाठी जात असलेल्या धानाने भरलेल्या ट्रकला आग : नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : हिरापूरवरून गोरेगाव मार्गे गणखैरा येथे भरडाईसाठी धान वाहून नेणाऱ्या ट्रकला शनिवारी (२६) दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास साईबारजवळ अचानक आग लागली. नागरिकांच्या प्रसंगावधानाने आणि तत्काळ मदतीने मोठी दुर्घटना टळली, मात्र ट्रकचे केबिन संपूर्ण जळून खाक झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

प्राप्त माहितीनुसार, प्रगती सुशिक्षित बेरोजगार संस्था मर्यादित, घोटी या संस्थेच्या हिरापूर येथील गोदामातून ट्रक (क्रमांक एमएच ०४ जीसी ३८७७) भरडाईसाठी धान घेऊन गणखैरा येथील राज फूड मिलकडे निघाला होता. गोरेगाव शहरातील साईबारच्या पुढे अचानक ट्रकच्या केबिनमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. आगीचे लोळ पाहून चालक समीर शेख यांनी प्रसंगावधान राखून ट्रकवरून उडी मारून जीव वाचविला.

घटनेनंतर परिसरातील कैलास खरवडे यांच्या मोटारसायकल दुरुस्तीच्या दुकानातून पाईपच्या सहाय्याने आणि नागरिकांनी घरातील पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. कैलास खरवडे, गुड्डू कटरे आणि राम अगडे यांच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे आगीवर लवकर नियंत्रण मिळवता आले.

दरम्यान, धानाने भरलेल्या ट्रकला आग लागल्याची माहिती मिळताच नागरिकांनी गोंदिया व गोरेगाव येथील अग्निशमन विभागाला कळविले. मात्र आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतरच गोंदिया व गोरेगाव येथील अग्निशमनची वाहने घटनास्थळी पोहोचली. या विलंबामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप उसळला. विशेषतः गोरेगाव नगरपंचायतच्या हलगर्जीपणाबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली, कारण घटनास्थळी वेळेत मदत पोहोचली असती तर आणखी काही नुकसान टाळता आले असते.

या घटनेने स्थानिक आपत्ती व्यवस्थापन व्यवस्था आणि प्रशासनाच्या तत्परतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असला, तरी प्रशासनाने भविष्यात अशा घटनांमध्ये वेळेवर मदत पोहोचविणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.





  Print






News - Gondia




Related Photos