महत्वाच्या बातम्या

 अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टर चालकांवर गुन्हे : १५.१८ लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : तालुक्यातील नदी आणि नाल्यांच्या पात्रातून बेकायदेशीररीत्या वाळू उत्खनन करून विनापरवाना वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी संतोषी माता वार्ड परिसरात तपासणीदरम्यान अवैध वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर चालक महसूल पथकाच्या ताब्यातून ट्रॅक्टरसह पळून गेले. या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी तिन्ही ट्रॅक्टर चालक-मालकांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून तीन ट्रॅक्टरसह एकूण १५ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बल्लारपूर तालुक्यातील नदी व नाल्यांच्या पात्रातून होणारे अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी तहसीलदार रेणुका कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपासणी पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकात मंडळ अधिकारी मनोज शेंडे आणि ग्राम महसूल अधिकारी अजय नौकरकर यांचा समावेश आहे. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास हे पथक संतोषी माता वार्ड परिसरात तपासणी करीत असताना विना क्रमांकफलक असलेल्या ट्रॅक्टरमधून वाळूची वाहतूक होत असल्याचे आढळले.

या कारवाईदरम्यान चार ट्रॅक्टरमधून प्रत्येकी एक ब्रास वाळूची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. संबंधित चालकांची चौकशी करून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, यावेळी प्रवीणकुमार बहुरिया रा. बल्लारपूर, रवी देरकर आणि श्रीकांत अनमदवार दोघेही रा. बामणी यांनी महसूल पथकाच्या कारवाईला न जुमानता आपापले ट्रॅक्टर घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाला. या प्रकरणी मंडळ अधिकारी मनोज शेंडे यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार तिन्ही ट्रॅक्टर चालक-मालकांविरुद्ध गुन्हा क्रमांक ११०८/२०२६ अन्वये २१ नोव्हेंबर रोजी फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी तीन ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केले असून, वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या वाहनांसह एकूण १५ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

दरम्यान, याच कारवाईदरम्यान आढळलेल्या चौथ्या ट्रॅक्टर चालकाने आपले ट्रॅक्टर तहसील कार्यालय बल्लारपूर येथील शासकीय परिसरात उभे केले असून, त्याच्याविरुद्ध नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महसूल विभागाने दिली. अवैध वाळू उत्खनन आण वाहतुकी विरुद्धची मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.





  Print






Related Photos