निवृत्तीवेतन धारकांसाठी २५ व २६ नोव्हेंबरला डिजिटल लाईफ सर्टिफिकेटची सुविधा


- चंद्रपूर जिल्हा कोषागार कार्यालयात विशेष व्यवस्था; प्रलंबित जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांचे मासिक निवृत्तीवेतन अखंडितपणे सुरू राहण्यासाठी दरवर्षी जीवन प्रमाणपत्र (डिजिटल लाईफ सर्टिफिकेट) सादर करणे आवश्यक असते. या प्रक्रियेत निवृत्तीवेतनधारकांना सुविधा मिळावी आणि त्यांचे प्रमाणपत्र वेळेत सादर व्हावे, यासाठी जिल्हा कोषागार कार्यालय, चंद्रपूर येथे २५ व २६ नोव्हेंबर रोजी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट काढण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
बुधवार, २५ नोव्हेंबर आणि गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६ या दोन दिवशी कार्यालयीन वेळेत ही सुविधा पूर्णवेळ उपलब्ध राहणार आहे. ज्या निवृत्तीवेतनधारकांचे तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र अद्याप सादर करणे बाकी आहे, त्यांनी या विशेष सुविधेचा लाभ घेऊन आपले प्रमाणपत्र काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी तृप्ती टेमकर यांनी केले आहे.
डिजिटल प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे -
डिजिटल लाईफ सर्टिफिकेट काढण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांनी काही आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे गरजेचे आहे. यामध्ये आधार कार्ड, आधारशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक (ओटीपी प्राप्त करण्यासाठी), पीपीओ क्रमांक (PPO Number) आणि बँक खात्याचे पासबुक यांचा समावेश आहे.
निवृत्तीवेतनधारकांनी ही सर्व कागदपत्रे सोबत घेऊन जिल्हा कोषागार कार्यालय, चंद्रपूर येथे उपस्थित राहावे. जीवन प्रमाणपत्र वेळेत सादर केल्यास निवृत्तीवेतन वितरणात अडथळे निर्माण होण्याची शक्यता टाळता येईल. त्यामुळे अद्याप प्रमाणपत्र सादर न केलेल्या निवृत्तीवेतनधारकांनी २५ व २६ नोव्हेंबर या दोन दिवसांत उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.




Petrol Price




