महत्वाच्या बातम्या

 बारा मागण्यांवरून कोठारी ग्रामसभा तापली : सरपंचांना ग्रामपंचायत कार्यालयात तासभर कोंडले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : ग्रामपंचायतीच्या कारभाराचा आणि विकासकामांवरील खर्चाचा हिशोब मागणाऱ्या बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथील ग्रामस्थांचा संताप शुक्रवारी ग्रामसभेत उफाळून आला. बारा मागण्यांवरून ग्रामसभा चांगलीच वादळी ठरली. ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याचा आरोप करीत संतप्त नागरिकांनी सरपंच अश्विनी वासमावर यांना ग्रामपंचायत कार्यालयात तब्बल एक तास कोंडून ठेवले. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर त्यांची सुटका करण्यात आली. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात तरुणांनी कोठारी बंदचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

कोठारी ग्रामपंचायतीच्या विकासकामांवर झालेला खर्च, साहित्य खरेदी, पाणीपुरवठा, पाणीपट्टी, घरपट्टी आणि इतर आर्थिक व्यवहारांचा संपूर्ण तपशील सार्वजनिक करावा, अशी मागणी गावातील तरुणांकडून सातत्याने केली जात होती. ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी विशेष ग्रामसभा घेण्यात यावी, या मागणीसाठी यापूर्वी दोन वेळा आंदोलनही करण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.

सरपंच अश्विनी वासमावर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. संभाव्य तणाव लक्षात घेता पोलिसांचाही बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सभेत तरुणांनी बारा मागण्या मांडत ग्रामपंचायतीच्या विकासकामांचा आणि आर्थिक व्यवहारांचा सविस्तर हिशोब मागितला. मात्र, उपस्थित केलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.

ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून न घेताच सरपंचांनी सभा समाप्त केल्याचा आरोप करीत संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या दिला. त्यामुळे सरपंचांना सुमारे एक तास कार्यालयातच कोंडून ठेवण्यात आले. परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी मध्यस्थी केली. त्यानंतर सरपंचांची सुटका करून त्यांना पोलिस बंदोबस्तात घरी रवाना करण्यात आले.

दरम्यान, ग्रामपंचायतीच्या सर्व आर्थिक व्यवहारांचा हिशोब सार्वजनिक करावा, विकासकामांवरील खर्चाचा तपशील ग्रामस्थांसमोर मांडावा आणि उपस्थित प्रश्नांची उत्तरे द्यावीत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. मागण्यांची दखल न घेतल्यास कोठारी बंद करून व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनकर्ते आकाश देठे यांनी ग्रामस्थांच्या प्रश्नांना बगल देत सभा संपविण्यात आल्याने सरपंचांना जाब विचारण्यासाठी ठिय्या आंदोलन केल्याचे सांगितले.





  Print






Related Photos