महत्वाच्या बातम्या

 नवनियुक्त शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकाऱ्यांचा शिक्षक संघटनेतर्फे सत्कार


- प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; लवकरच सर्व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे आश्वासन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती प्राथमिक शिक्षक संघटना, जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने जिल्हा परिषद गडचिरोली येथे नव्याने रुजू झालेले शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मा. श्री. प्रेरक उजगारे तसेच उपशिक्षणाधिकारी मा. श्री. परसावार यांची बुधवार,१९ ऑगस्ट २०२६ रोजी सदिच्छा भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने नवनियुक्त अधिकाऱ्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. नव्या शैक्षणिक प्रशासनाकडून जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळावा, तसेच शिक्षकांच्या अडचणींचे वेळेत निराकरण व्हावे, या अपेक्षेने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा -
भेटीदरम्यान प्राथमिक शिक्षकांशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण आणि प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. शिक्षकांच्या सेवा-संबंधित अडचणी, प्रशासकीय प्रश्न तसेच इतर प्रलंबित बाबी मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी नवनियुक्त शिक्षणाधिकारी मा. श्री. प्रेरक उजगारे यांनी शिक्षकांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेण्यात येणार असून, प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.या आश्वासनामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रशासन आणि शिक्षक संघटनांमध्ये समन्वयाची प्रक्रिया अधिक गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित -
या सत्कार व चर्चेच्या कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर, प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष  योगेश ढोरे, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष  पुंडलिक देशमुख, आदर्श शिक्षक समितीचे जिल्हाप्रमुख प्रदीप सेलोकर तसेच जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष  गुरुदेव नवघडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.तसेच  धनपाल मिसार, राजेश चिल्लमवार,  बापू मुनघाट, धनेश कुकडे, अमरदिप भुरले, आशिष धात्रक, देव लांजेवार, लोमेश उंदीरवाडे, साईनाथ अलोणे, राजेश बाळराजे, राजेंद्र भुरसे, डंबेश पेंदाम, सुनील मेंढे, प्रशांत काळे, राकेश रोकडे,  राकेश सोनटक्के आदी शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

नवनियुक्त शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकाऱ्यांचा सत्कार आणि त्यानंतर झालेली शिक्षकांच्या प्रश्नांवरील चर्चा ही जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी सकारात्मक पाऊल मानले जात असून, आगामी काळात प्रशासन व शिक्षक संघटनांच्या समन्वयातून प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.





  Print






Related Photos