अनुपस्थित, स्थलांतरित, मृत व दुबार नोंदीतील मतदारांना गणना प्रपत्र सादर करण्याची पुन्हा संधी

- चंद्रपूर जिल्ह्यात २ लाख ७० हजार १५३ मतदारांच्या नोंदी; ३० नोव्हेंबरपर्यंत प्रपत्र सादर करण्याची मुदत २२ डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर-२०२६) प्रक्रियेंतर्गत अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार (ASDD) म्हणून नोंद झाल्यामुळे प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या पात्र मतदारांना भारत निवडणूक आयोगाने पुन्हा एक संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार संबंधित मतदारांना १८ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत गणना प्रपत्र सादर करता येणार आहे. या प्रक्रियेनंतर २२ डिसेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात २ लाख ७० हजार १५३ मतदारांच्या नोंदी -
चंद्रपूर जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये राबविण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान एकूण २ लाख ७० हजार १५३ मतदारांच्या विविध प्रकारच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. यामध्ये ५१ हजार ९१३ मृत मतदार, २८ हजार ५३२ अनुपस्थित मतदार, १ लाख ६२ हजार ८४४ कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, २५ हजार ६२३ आधीच नोंदणी झालेले किंवा दुबार नोंदीतील मतदार आणि १ हजार २४१ इतर मतदारांचा समावेश आहे.
गणना प्रपत्र सादर करण्यासाठी ऑनलाइन सुविधा -
संबंधित मतदारांना त्यांच्या पूर्वीच्या मतदार ओळखपत्रावरील (EPIC) क्रमांकाचा वापर करून भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा ECINET ॲपद्वारे गणना प्रपत्र डाउनलोड करून सादर करता येणार आहे. पूर्वीच्या पत्त्यावरच वास्तव्यास असलेल्या मतदारांनी गणना प्रपत्रासोबत परिशिष्ट-ब मधील निवेदन सादर करावे. तर राज्यांतर्गत स्थलांतरित झालेल्या मतदारांनी नवीन पत्त्याचा तपशील आणि आवश्यक पुराव्यांसह परिशिष्ट-क मधील निवेदन जोडणे आवश्यक आहे. अशा स्थलांतरित मतदारांना स्वतंत्रपणे नमुना-८ सादर करण्याची आवश्यकता नाही.
याशिवाय संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) मतदारांशी संपर्क साधून गणना प्रपत्र प्रत्यक्ष उपलब्ध करून देतील. तसेच व्हॉट्सॲप, ई-मेल किंवा एसएमएसद्वारेही हे प्रपत्र पाठविण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. Book a Call with BLO या सुविधेच्या माध्यमातून मतदारांना संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येईल. एसआयआर प्रक्रियेदरम्यान ज्या मतदारांनी यापूर्वीच नमुना-६ सादर केला आहे, त्यांना पुन्हा गणना प्रपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही.
निवडणूक आयोगाचे सुधारित वेळापत्रक जाहीर -
भारत निवडणूक आयोगाने एसआयआर प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी ३१ ऑगस्ट ते १५ डिसेंबर २०२६ असा असून, प्राप्त दावे व हरकतींचा निपटारा १५ डिसेंबरपर्यंत करण्यात येणार आहे. ASDD प्रवर्गातील मतदारांसाठी गणना प्रपत्रांची छपाई १८ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, १८ ते ३० नोव्हेंबरदरम्यान प्रपत्रांचे वितरण व संकलन केले जाणार आहे. प्राप्त झालेल्या गणना प्रपत्रांवर १० डिसेंबर २०२६ पर्यंत कार्यवाही पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर २२ डिसेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.
पात्र मतदारांनी मुदतीत कार्यवाही करावी -
संबंधित मतदारांनी प्रारूप मतदार यादीमध्ये आपले नाव तपासून घ्यावे. यादीत नाव समाविष्ट नसल्यास संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आवश्यक गणना प्रपत्र व निवेदन विहित मुदतीत सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. एकही पात्र मतदार मतदार यादीपासून वंचित राहू नये आणि एकही अपात्र मतदार मतदार यादीत समाविष्ट राहू नये, हा या विशेष पुनरीक्षण प्रक्रियेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे संबंधित सर्व मतदारांनी उपलब्ध करून दिलेल्या या संधीचा लाभ घेऊन आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.




Petrol Price




