वृद्धाश्रमातील ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर फुलविले दिवाळीचे हास्य : एसएनडीटी महिला विद्यापीठाचा माणुसकीचा उपक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सोहळा. मात्र, याच सणाच्या काळात अनेक ज्येष्ठ नागरिकांना एकटेपणाचा सामना करावा लागतो. ही जाणीव ठेवत श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाच्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर येथील समाजकार्य विभागाने मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसोबत दिवाळी साजरी करून त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण फुलविले.
विद्यापीठाचे बल्लारपूर परिसर संचालक डॉ. राजेश इंगोले, उपकुलसचिव डॉ. बाळू राठोड आणि समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थिनींनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या सुख-दुःखाची विचारपूस केली. त्यानंतर मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले. ग्लासमध्ये चेंडू टाकणे, एका हाताने ग्लासचा मनोरा तयार करणे यांसारख्या खेळांत ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. वय विसरून खेळात रमलेल्या ज्येष्ठांच्या चेहऱ्यावरील हास्याने संपूर्ण परिसर आनंदमय झाला. फुलझाड्या आणि लसूण फटाके फोडून दिवाळीचा उत्साहही द्विगुणित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे नियोजन समाजकार्य विभागाच्या विद्यार्थिनींनी केले. सहायक प्राध्यापक डॉ. दुर्गेश साठवणे, सचिन सावसाकडे तसेच आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या श्रद्धा किन्नाके यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक अंशुल रणदिवे, वृद्धाश्रमातील सदस्य तसेच भोजन व्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या आशा उपरे आणि मनीषा कानपूरे यांनी उपक्रमासाठी सहकार्य केले.
शिक्षण केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित नसून त्यातून सामाजिक संवेदनशीलता आणि माणुसकीची जाणीव निर्माण होणेही तितकेच महत्त्वाचे आहे, हे या उपक्रमातून विद्यार्थिनींनी कृतीतून दाखवून दिले. ज्येष्ठ नागरिकांना महागड्या भेटवस्तूंपेक्षा आपुलकीचे दोन शब्द, थोडा वेळ आणि प्रेमाची साथ अधिक मोलाची असते. दिवाळीच्या निमित्ताने मिळालेल्या या सहवासामुळे वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य हाच या उपक्रमाचा खरा आनंद ठरला.




Petrol Price




