शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी पुरस्कार प्राप्त शिक्षकांची भूमिका महत्वाची - पालकमंत्री डॉ.पंकज भोयर


- राज्यस्तरीय शिक्षक संमेलनाचे उद्घाटन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : खाजगी शाळांच्या तुलनेत मराठी व सरकारी शाळांमधील कमी होत असलेली पटसंख्या वाढविण्यासाठी शाळांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासोबत शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी पुरस्कार प्राप्त शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे. पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी शिक्षणामध्ये बदल तसेच विद्यार्थ्यांची गुणवता वाढविण्यासाठी सहकार्य करावे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.
सेवाग्राम येथील यात्री निवास येथे राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे राज्यस्तरीय शिक्षक संमेलन आयोजित करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी खासदार रामदास तडस, शिक्षक आघाडीचे पूर्व विदर्भ अध्यक्ष अनिल शिवणकर, राज्याध्यक्ष सुभाष जिवरणकर, राज्य कार्याध्यक्ष दशरथ शिंगारे, जिल्हाध्यक्ष प्रा. मोहन गुजरकर, राज्य प्रतिनिधी देवेंद्र गाठे आदी उपस्थित होते. राज्यात खाजगी व सरकारी अशा १ लाख ६० हजार शाळा आहे. सरकारी शाळांचा दर्जा टीकवून ठेवण्यासाठी शाळांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करुण देण्यात येत असून आदर्श शाळा निर्माण करण्यात येत आहे. शाळांमध्ये ई-लर्निग सुविधा, डिजीटल शिक्षण यासारख्या सुविधा निर्माण करुन देण्याचा शासनाचा प्रयत्न सुरु आहे.
यासाठी शिक्षकांनी सुद्धा पालकांशी प्रत्यक्ष संपर्कात राहून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करावी, असे पुढे बोलतांना पालमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान संशोधनाची रुची निर्माण व्हावी यासाठी जिल्हा, राज्यस्तरावर आयोजित विज्ञान प्रदर्शनीमध्ये उत्कृष्ठ विज्ञान मॉडेल तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुरस्कार रक्कमेत ५ हजारवरुन ५१ हजार रुपयाची वाढ करण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान संशोधनाची संधी मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. तसेच विज्ञान प्रदर्शनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नासा व इस्त्रोसारख्या संस्थांमध्ये भेट देऊन तेथील संशोधन शिकण्याची संधी मिळण्यासाठी योजना सुरु करण्यात आली असल्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले.
राष्ट्रीय व राज्य शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांना पुर्वी देण्यात येणारी आगावू वेतनवाढ बंद करण्यात आली होती, ती सुरु करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचेही ते पुढे बोलतांना म्हणाले. यावेळी माजी खासदार रामदास तडस यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन गुजरकर यांनी केले. कार्यक्रमाला राज्यातील पुरस्कार प्राप्त शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Petrol Price




