दोन दशकांपासून तकिया वॉर्डातील रस्त्यांना दुरुस्तीची प्रतीक्षा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : शहरातील तकिया वॉर्डातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना खड्डे, चिखल आणि साचलेल्या पाण्याचा सामना करावा लागत आहे. विशेषतः साई मंदिरामागील परिसरातील रस्ते ठिकठिकाणी उखडले असून, पावसामुळे त्यांची अवस्था आणखी बिकट झाली आहे. त्यामुळे पादचारी, दुचाकीस्वार आणि वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या परिसरातील रस्त्यांची समस्या आजची नसून तब्बल दोन दशकांपासून कायम आहे. रस्त्यांची नियमित देखभाल आणि डागडुजी होत नसल्याने रस्त्यांची झीज वाढतच गेली आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचून संपूर्ण रस्ता चिखलमय होत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडतानाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
खड्डे, चिखलामुळे अपघाताचा धोका -
रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे आणि चिखलामुळे दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग धोकादायक ठरत आहे. खड्डे चुकविताना दुचाकी घसरण्याची शक्यता असून, किरकोळ अपघातांचाही धोका वाढला आहे. पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यांची खोली लक्षात येत नसल्याने वाहनचालकांची अधिकच कसरत होत आहे. रात्रीच्या वेळी परिस्थिती आणखी गंभीर बनते. अपुऱ्या प्रकाशामुळे रस्त्यावरील खड्डे आणि चिखलाचा अंदाज येत नसल्याने वाहनचालकांसाठी मोठा धोका निर्माण होतो. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांनाही या खराब रस्त्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे.
रुग्णवाहिकांनाही अडथळा -
तकिया वॉर्डातील या परिसरात मोठ्या प्रमाणावर खासगी रुग्णालये आहेत. त्यामुळे रुग्णांना घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकांचीही या मार्गावरून नियमित ये-जा असते. मात्र, रस्त्यांची दुरवस्था असल्याने रुग्णवाहिकांना संथ गतीने मार्गक्रमण करावे लागते. गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी वेळ महत्त्वाचा असताना खराब रस्त्यांमुळे निर्माण होणारा हा अडथळा चिंतेचा विषय ठरत आहे.
वारंवार मागणी करूनही कार्यवाही नाही -
रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार करण्यात आली आहे. मात्र, अद्याप या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. केवळ तात्पुरती डागडुजी न करता रस्त्यांची पाहणी करून ज्या ठिकाणी आवश्यक आहे, तेथे नव्याने रस्ते बांधण्यात यावेत, अशी मागणी होत आहे. भंडारा नगरपालिका प्रशासनाने तकिया वॉर्डातील रस्त्यांच्या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन पाहणी करावी.
खड्डे बुजविण्यासोबतच पावसाळ्यात पाणी व चिखल साचणार नाही, यासाठी आवश्यक निचरा व्यवस्था करावी आणि खराब झालेल्या रस्त्यांचे कायमस्वरूपी बांधकाम करावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दोन दशकांपासून सुरू असलेल्या या समस्येला आता तरी पूर्णविराम मिळणार का, असा सवाल तकिया वॉर्डातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.




Petrol Price




