महत्वाच्या बातम्या

 महाराष्ट्र दर्शनाला गेलेल्या कुटुंबांच्या घरात घरफोडी : २४ हजारांचा मुद्देमाल लंपास


- साहूर परिसरातील घटना; रोख रक्कम व दागिने चोरीला, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : महाराष्ट्र दर्शनासाठी कुटुंबीय बाहेरगावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी बंद घरात प्रवेश करत रोख रक्कम आणि दागिने असा एकूण २४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना साहूर परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

या प्रकरणी गजानन रमेशराव बीजवे ३२ वर्षे, रा. साहूर यांनी आष्टी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

घरात कोणी नसल्याची साधली संधी -
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार गजानन बीजवे यांचे आई-वडील महाराष्ट्र दर्शनासाठी बाहेरगावी गेले होते. त्यामुळे घर काही काळ बंद होते. घरात कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला.

चोरट्यांनी घरातील सामानाची झडती घेत रोख रक्कम व दागिने असा एकूण २४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. घरातील चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर बीजवे यांनी तातडीने आष्टी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

चोरट्यांचा शोध सुरू -
तक्रार प्राप्त होताच आष्टी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, चोरी करणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. परिसरातील संशयास्पद हालचाली तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिस तपास करीत आहेत.

बंद घरांना लक्ष्य करून चोरी करणाऱ्या या चोरट्यांचा लवकरच माग काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या घटनेनंतर नागरिकांनी घर काही दिवसांसाठी बंद ठेवून बाहेरगावी जाताना सुरक्षेची आवश्यक खबरदारी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे. 





  Print






Related Photos