महत्वाच्या बातम्या

 रेशीम उत्पादनातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला बळ : वर्ध्यात आकार घेत आहे रेशीम क्रांती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस         
प्रतिनिधी / वर्धा : पारंपारिक शेतीला बगल देत आणि निसर्गाच्या लहरीपणावर मात करत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाच्या माध्यमातून आर्थिक क्रांती घडवून आणली आहे. ऑगष्टच्या हंगामात प्रयोगशील शेतकऱ्यांनी रेशीम कोष उत्पादनाची विक्रमी कामगिरी केली. केवळ मर्यादित मनुष्यबळ हाताशी असताना जिल्हा प्रशासन आणि रेशीम विकास कार्यालयाच्या तांत्रिक नियोजनामुळे जिल्ह्यातील शेतकरी आता रेशीम शेतीच्या जोरावर आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत.

केवळ २२ दिवसांत शेतकऱ्यांना लाखोंचे उत्पन्न -
गेल्या ऑगष्ट महिन्याच्या लॉटमध्ये जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी उत्कृष्ट व्यवस्थापन राखत अवघ्या २२ ते २४ दिवसांच्या अत्यंत कमी कालावधीत उत्तम दर्जाच्या रेशीम कोषांची निर्मिती केली.

बाजारात मिळालेल्या दरामुळे जिल्ह्यातील कुरझडी येथील वृषभ रेवतकर यांनी १ लाख ९५ हजार ७८०, घोराड येथील विवेक माहुरे यांनी १ लाख ६२ हजार, झाडगाव येथील भावना भागडे  १ लाख ६० हजार, लहान आर्वी येथील संदीप कांबळे १ लाख ४० हजार, शेकापूर येथील प्रणित ढगे १ लाख २५ हजार, कुरझडी फोर्ट येथील प्रमोद रघाटाटे १ लाख १९ हजार ४०२, नाचणगाव येथील राम पोलकडे यांनी १ लाख ११ हजार ३४० व रसुलाबाद येथील अजय आसोले या शेतकऱ्याने १ लाख ७हजार ४४४  रुपयाचे उत्पन्न मिळविले. या मुख्य शेतकऱ्यांसोबतच इतर अनेक रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनाही कोष उत्पादन नुसार ६० हजार ते ८० हजार रुपयांपर्यंतचे उत्तम उत्पन्न मिळाले आहे.

दर्जेदार चॉकी वाटप आणि योग्य तांत्रिक मार्गदर्शन ठरले फायदेशीर -
रेशीम उद्योग हा पूर्णपणे तांत्रिक बाबी आणि बाल अवस्थेतील कीटकांच्या दर्जावर अवलंबून असतो. या बॅचच्या यशात पवनार येथील प्रांजल वाघमारे यांच्याकडून वेळेवर शेतकऱ्यांना वाटप झालेले निरोगी व दर्जेदार चॉकी अत्यंत महत्वाचे ठरले आहे. रेशीम कीटक संगोपनामध्ये वेळेवर दर्जेदार खाद्य, शेडमधील तापमान, आर्द्रता, शेडच्या आत खेळती हवा, निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता या सर्व तांत्रिक गोष्टींचे व्यवस्थापन महत्वाचे असते.

तांत्रिक बाबी काटेकोरपणे सांभाळल्यास तसेच वर्षाला एकरी पाच पिके घेता येत असल्याने केवळ स्वतःचे लक्षपूर्वक व्यवस्थापन सुधारल्यास शेतकरी यात नक्कीच समृध्द होतो, याबाबत शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले.

रेशीम संचालनालयाजचे धोरणात्मक मार्गदर्शन -
राज्यामध्ये रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी रेशीम संचालक विनय मुन यांचे धोरणात्मक मार्गदर्शन आणि सततचे प्रोत्साहन या यशामागे महत्वाचे राहिले आहे. संचालनालयामार्फत वेळेवर उपलब्ध करुन देण्यात येणारा निधी, तांत्रिक सल्ले आणि नाविन्यपूर्ण योजनांमुळेच जिल्हास्तरावर अशी विक्रमी कामगिरी करणे शक्य झाले आहे.

जिल्हा प्रशासनाचे खंबीर पाठबळ -
जिल्ह्याला शेतीपूरक व्यवसायात अग्रेसर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नेहमीच प्रशासकीय यंत्रणेला खंबीर पाठबळ दिले आहे. मनुष्यबळाची कमतरता असली, तरीही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे या ध्येयाने जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी वेळोवेळी आढावा घेऊन प्रोत्साहन दिले आहे.

इतर शेतकऱ्यांनीही रेशीमचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन -
कमी पाण्यात, कमी जागेत, कमी खर्चात वर्षभर वाट न पाहता महिन्याभरात निश्चित पैसा देणारा हा एक शाश्वत उद्योग आहे. शासनातर्फे यासाठी विविध योजनांतून अनुदानही दिले जाते. जिल्हाधिकारी वान्मथी सी आणि रेशीम विकास अधिकारी रजनी बन्सोड यांनी जिल्ह्यातील इतर अल्पभूधारक व पारंपारिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनीही योग्य तांत्रिक शिस्त पाळत रेशीम शेतीची कास धरावी, असे आवाहन केले आहे.





  Print






Related Photos