मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्तीच्या पात्र लाभार्थ्यांना कागदपत्राची पुर्तता करावी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत इयत्ता १ ली ते १० वीत शिकणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता विविध मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्राची पुर्तता करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती योजनेंतर्गत ३ हजार ५०० रुपये देण्यात येणार असून यासाठी पालक साफसफाई क्षेत्रात काम करीत असल्याचे सक्षम प्राधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र व स्वयंघोषणापत्र आवश्यक आहे.
इयत्ता ९ वी व १० वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती योजनेंतर्गत ३ हजार ५०० रुपये देण्यात येणार असून पालकाचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयाच्या आत असावे. त्यांच्याकडे जात प्रमाणपत्र असावे. इयत्ता ५ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थींनींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेंतर्गत इयत्ता ५ ते ७ वी पर्यंत ६०० रुपये आणि ८ वी ते १० पर्य १ हजार रुपये देण्यात येते. यासाठी विद्यार्थ्यांनी नियमित उपस्थित असावी. यासाठी कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता नाही.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण फी व परीक्षा फी योजना खाजगी विना अनुदानित व कायम विना अनुदानित शाळेत शिकणाऱ्या दारिद्रय रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत इयत्ता १ ली ते ४ थीपर्यंत १ हजार रुपये, इयत्ता ५ वी ७ वी १ हजार ५०० रुपये आणि इयत्ता ८ वी ते १० वी २हजार रुपये देण्यात येणार आहे. गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना या योजनेंतर्गत विद्यार्थी मागास प्रवर्गातून प्रथम किंवा द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेला असावा व किमान गुण ५० टक्के असावे. पात्र इयत्ता ५ वी ते ७ वी पर्यंत ५०० रुपये आणि ८ वी ते १० वी पर्यंत १ हजार रुपये देण्यात येणार असून यासाठी कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता नाही.
या सर्व शिष्यवृत्ती योजनांचा लाभ आधारसंलग्नित बॅंक खात्यात जमा करण्यात येणार असल्याने योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी तथा पालकाचे आधार अपडेट असणे अनिवार्य आहे. पालक व विद्यार्थ्यांनी मोबाईल क्रमांक आधार सोबत लिंक करावा. सोबतच विद्यार्थ्याचे स्वतःचे आधार संलग्नित बँक खाते असणे आवश्यक आहे. शाळा मुख्याध्यापकांनी शिष्यवृत्ती अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची मागणी करताच कागदपत्रे पुरविण्यात यावे. त्यासाठी शाळेच्या संपर्कात राहून आपल्या पाल्याचा अर्ज भरण्यासाठी सहकार्य करावे.
तसेच इ. ९ वी १० वी मधे शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेकरीता उत्पन्न प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. ज्या विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र किंवा उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढलेले नसतील अशा विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र व उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढण्याकरीता उपविभागीय अधिकारी यांच्याद्वारे शाळास्तरावर शिबीराचे आयोजन करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावेत, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.




Petrol Price




