महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूरमध्ये १ हजार परवडणाऱ्या घरकुलांचा मार्ग मोकळा होणार : म्हाडाकडून कार्यवाहीचे आश्वासन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर शहरातील सर्वसामान्य आणि गरजू कुटुंबांना हक्काचे, परवडणारे घर मिळावे यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईत म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन बल्लारपूरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १ हजार घरकुले उभारण्याची मागणी केली. या प्रस्तावावर तातडीने प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्याची मागणी त्यांनी केली असून, जयस्वाल यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

बल्लारपूर शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू कुटुंबांसाठी परवडणाऱ्या घरांची गरज लक्षात घेऊन हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक कुटुंबांना परवडणाऱ्या घरांची प्रतीक्षा आहे. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून १ हजार घरकुलांचा प्रकल्प पुढे नेण्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली.

घरकुल हा केवळ चार भिंतींचा विषय नसून कुटुंबाच्या सुरक्षितता, स्थैर्य आणि सन्मानाशी जोडलेला प्रश्न आहे. त्यामुळे बल्लारपूरमधील गरजू नागरिकांना घर उपलब्ध करून देताना प्रकल्पाच्या अंमलबजावणीला वेग मिळावा, यासाठी म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आ. मुनगंटीवार यांनी सविस्तर चर्चा केली.

या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना संजीव जयस्वाल यांनी पुढील कार्यवाहीसाठी येत्या तीन दिवसांत झूम बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे बल्लारपूरमधील १ हजार परवडणाऱ्या घरकुलांच्या प्रस्तावाला प्रशासकीय पातळीवर पुढील दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बल्लारपूरमधील गरजू कुटुंबांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे, या उद्देशाने हा प्रस्ताव पुढे नेण्यात आला असून, आगामी कार्यवाहीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.





  Print






Related Photos