सेवा संकल्प अभियानात ५०० हून अधिक लाभार्थ्यांना विविध शासकीय सेवांचा लाभ


- तहसील कार्यालय भंडारा येथे शिबिराचे आयोजन; विविध विभागांचा उत्स्फूर्त सहभाग
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : शासनाच्या १७ सप्टेंबर २०२६ रोजीच्या परिपत्रकानुसार महसूल विभागामार्फत १९ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी तहसील कार्यालय, भंडारा येथे सोमवार, ५ ऑक्टोबर रोजी सेवा संकल्प अभियान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ५०० हून अधिक लाभार्थ्यांनी विविध सेवांचा लाभ घेतला.
या शिबिराचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्र जाधव व निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी त्यांनी शिबिरातील विविध विभागांच्या सेवा कक्षांची पाहणी करून नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच नागरिकांच्या अर्जांवरील कार्यवाही तातडीने करून प्रकरणांचे निराकरण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
महसूल विभागांतर्गत किसान योजनेचे २७ लाभ, फेरफार प्रकरणे १५, वारस नोंद अर्ज ७, आधार कार्डसाठी २९, नवीन व अद्ययावत रेशन कार्डसाठी २१, विशेष सहाय्य योजनेअंतर्गत ६१ केवायसी, उत्पन्नाचे दाखले ४१, जात प्रमाणपत्र प्रकरणे १४, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्रे १०, अधिवास दाखले २५ आदी सेवांचा लाभ नागरिकांना देण्यात आला. आवश्यक प्रमाणपत्रांची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करून ती तातडीने वितरित करण्यात आली.
याशिवाय महाऊर्जा विभागाच्या ३६, उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या ३७, सह दुय्यम निबंधक कार्यालयाच्या ३४, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या ४७, एकात्मिक महिला व बाल विकास विभागाच्या २४, भूमी अभिलेख विभागाच्या ३७ तसेच आरोग्य विभागामार्फत ७२ लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. विविध विभागांच्या सहभागामुळे नागरिकांना अनेक शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्या.
तहसीलदार संदीप माकोडे यांनी शिबिरास भेट देऊन विविध विभागांच्या कामकाजाची पाहणी केली. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी नायब तहसीलदार घनश्याम सोनकुसरे, मंडळ अधिकारी, स्थानिक ग्राम महसूल अधिकारी, तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग व संजय गांधी विभागाचे कर्मचारी तसेच आरोग्य, कृषी, परिवहन, निबंधक कार्यालय, महाऊर्जा, जिल्हा कौशल्य विकास, महिला व बाल विकास, भूमी अभिलेख आणि सेतू विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.




Petrol Price




