महत्वाच्या बातम्या

 ४० फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान


- वनविभाग, पोलिस व रेस्क्यू पथकाच्या संयुक्त प्रयत्नांना यश; काही तासांत बिबट्याची सुखरूप सुटका

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : कारंजा घाडगे वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सेलगाव उमाटे शिवारातील एका शेतात सुमारे ४० फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभाग, पोलिस प्रशासन आणि रेस्क्यू पथकाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे जीवदान मिळाले. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आणि कौशल्याने राबविण्यात आलेल्या बचाव मोहिमेत अवघ्या काही तासांत बिबट्याला विहिरीबाहेर काढून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. बिबट्या निरोगी व सुदृढ असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार त्याला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

शिकारीचा पाठलाग करताना विहिरीत पडला -
शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास शिकारीचा पाठलाग करत असताना बिबट्या सेलगाव शिवारातील शेतकरी रघुनाथ शामराव हिंगवे यांच्या शेतात पोहोचला. परिसरात अंधार असल्याने विहिरीचा अंदाज न आल्याने बिबट्याचा तोल गेला आणि तो थेट सुमारे ४० फूट खोल विहिरीत पडला. विहीर खोल असल्यामुळे त्याला स्वतःहून बाहेर पडणे शक्य झाले नाही. रविवारी सकाळी शेतकरी व ग्रामस्थ शेतात गेले असता विहिरीतून बिबट्याचा आवाज ऐकू आला. त्यानंतर विहिरीत बिबट्या पडल्याचे समोर आले. घटनेची माहिती तत्काळ वनविभागाला देण्यात आली.

अवघ्या काही तासांत थरारक बचाव मोहीम -
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी, शीघ्र कृती दल तसेच कारंजा पोलिस प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने बचावकार्य सुरू केले. दोरीच्या साहाय्याने विहिरीत लोखंडी पिंजरा सोडण्यात आला. अत्यंत शिताफीने आणि कौशल्याने बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. त्यानंतर पिंजरा सावधगिरीने विहिरीबाहेर काढण्यात आला. काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही थरारक बचाव मोहीम यशस्वी झाली.

पशुवैद्यकीय तपासणीनंतर नैसर्गिक अधिवासात मुक्त -
विहिरीतून बाहेर काढल्यानंतर बिबट्याची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत प्राथमिक तपासणी करण्यात आली. तपासणीत बिबट्या पूर्णपणे निरोगी व सुदृढ असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

पोलिसांचा चोख बंदोबस्त -
बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. बचावकार्यादरम्यान गर्दीमुळे बिबट्याला धोका निर्माण होऊ नये तसेच रेस्क्यू पथकाच्या कामात अडथळा येऊ नये, यासाठी पोलिसांनी तातडीने चोख बंदोबस्त ठेवला. पोलिसांच्या तत्परतेमुळे बचावकार्य सुरळीतपणे पार पडले.

वनविभागाच्या पथकाची महत्त्वपूर्ण भूमिका -
ही संपूर्ण बचाव मोहीम वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद कोहळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. क्षेत्र सहाय्यक केकान, वनरक्षक व्ही. एस. आंबोलकर, वनरक्षक के. एस. कांबळे, अक्षय जाधव, अर्जुन कोरडे, कृष्ण कांबळे, प्रतीक कांबळे, सागर ठुट्टे, ए. डी. वेले, अडसळ, आयुष सातपुरे, गणेश काळे, स्वप्निल कौरती आणि गौरव कौरती यांनी बचावकार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. वनविभाग, पोलिस प्रशासन आणि रेस्क्यू पथकाने दाखविलेल्या तत्परतेमुळे एका वन्यजीवाचा जीव वाचला असून, या यशस्वी बचाव मोहिमेचे परिसरातून कौतुक होत आहे.





  Print






Related Photos