५६ रक्तदात्यांनी जपली माणुसकीची नाळ : रक्तदानातून गरजूंच्या जीवनाला मिळाली आशेची नवी किरणे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : एखाद्याच्या जीवन-मरणाच्या संघर्षात रक्ताचा एक थेंबही अनमोल ठरतो. याच सामाजिक जाणिवेतून चंद्रपुरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात तब्बल ५६ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून माणुसकीचा अनोखा संदेश दिला. स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त तसेच नगरसेविका सौ. श्वेता विप्लव लांडगे (तोतडे) यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिराचे उद्घाटन महानगरपालिका चंद्रपूरचे उपमहापौर प्रशांत दानव यांच्या हस्ते करण्यात आले. स्थायी समिती अध्यक्ष मनस्वीताई संदीप गिऱ्हे या सहउद्घाटक म्हणून उपस्थित होत्या.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गटनेते तथा नगरसेवक राहुल विरुटकर, नगरसेवक आकाश ऊर्फ पिंटू साखरकर, नगरसेविका श्रुती राकेश घटे आणि नगरसेविका किरणताई सचिन कोतपल्लीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. रक्ताची गरज असलेल्या रुग्णांसाठी प्रत्येक रक्तदात्याचे योगदान जीवनदायी ठरू शकते. हीच भावना मनात ठेवून नागरिक, शिवसैनिक, युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता ५६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यांच्या या योगदानामुळे सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण झाला.
शिबिरादरम्यान उपस्थित मान्यवरांनी रक्तदात्यांचे कौतुक करून त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल आभार व्यक्त केले. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. रक्तदानातून केवळ रक्ताची गरज भागत नाही, तर संकटात सापडलेल्या एखाद्या कुटुंबाला आशेचा आधार मिळतो, असा संदेश यावेळी देण्यात आला.
आयोजक नगरसेविका श्वेता विप्लव लांडगे (तोतडे) यांनी शिबिराच्या यशस्वीतेबद्दल सर्व रक्तदाते, वैद्यकीय पथक, पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते तसेच सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले. निरोगी नागरिकांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून नियमित रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. ५६ रक्तदात्यांच्या या योगदानातून रक्तदान हेच श्रेष्ठ दान ही भावना पुन्हा एकदा अधोरेखित झाली.




Petrol Price




