महत्वाच्या बातम्या

 वीजबिल आणि घरखर्चाच्या वादातून वडिलांवर स्क्रूड्रायव्हरने वार : उपचारादरम्यान मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : वीजबिल भरणे आणि घरखर्चासाठी पैसे देण्याच्या कारणावरून झालेल्या वादात मुलाने वडिलांच्या पोटावर स्क्रूड्रायव्हरने वार केल्याची धक्कादायक घटना लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बबलू सहारे (वय ५६, रा. बाबा नानक स्कूल, गरोबा मैदान, नागपूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी त्यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून मुलगा तुषार बबलू सहारे (वय २३) याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबलू सहारे हे हमालीचे काम करीत होते, तर त्यांचा मुलगा तुषार हा इलेक्ट्रिशियनचे काम करतो. १६ सप्टेंबरच्या रात्री बबलू यांनी मद्यप्राशन केले होते. त्यानंतर वीजबिल भरणे तसेच घरखर्चासाठी पैसे देण्याच्या मुद्द्यावरून बबलू आणि तुषार यांच्यात वाद झाला. वाद वाढल्यानंतर तुषारने स्क्रूड्रायव्हरने वडिलांच्या पोटावर वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे

पोटदुखीचा त्रास कायम -
हल्ल्यात पोटाला दुखापत झाल्यानंतर बबलू यांना परिसरातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार केल्यानंतर त्यांना घरी आणण्यात आले. मात्र, दुसऱ्याच दिवशी म्हणजे १७ सप्टेंबर रोजी त्यांच्या पोटात पुन्हा दुखू लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तात्पुरते उपचार करण्यात आले.

१८ सप्टेंबर रोजीही पोटदुखीचा त्रास कायम असल्याने त्यांना पुन्हा खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर मेयो रुग्णालयातही उपचार करण्यात आले. उपचारानंतर बबलू यांना घरी आणण्यात आले. मात्र, पोटदुखी कमी होत नसल्याने १९ सप्टेंबर रोजी त्यांना मानेवाडा परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने तेथून त्यांना मेडिकल रुग्णालयात हलविण्यात आले.

मेडिकलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू -
मेडिकल रुग्णालयात बबलू सहारे यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. दुखापतीनंतर सुरुवातीला तात्पुरते उपचार झाल्याची माहिती समोर आली आहे. वारंवार उपचार करूनही पोटदुखी कायम राहिल्याने अखेर त्यांची प्रकृती गंभीर झाली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, घरातील वीजबिल आणि खर्चासाठी पैसे देण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादाचे पर्यवसान वडिलांच्या मृत्यूत झाल्याने सहारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी तक्रारीच्या आधारे तुषार सहारे याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.





  Print






Related Photos