बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गडचिरोलीत आजपासून दोन दिवसीय जनजाती गौरव सोहळा


- पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधणार संवाद; राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गडचिरोली येथे १४ व १५ नोव्हेंबर रोजी दोन दिवसीय भव्य जनजाती गौरव दिवस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा संकुल क्रीडा मैदानावर होणाऱ्या या सोहळ्यात आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा, लोककला, नृत्य, गायन आणि ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडणार आहे. विशेष म्हणजे, १५ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशवासीयांशी संवाद साधणार आहेत.
या सोहळ्याला राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जुएल ओराम, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
१४ नोव्हेंबर रोजी सकाळपासून आदिवासी समाजाच्या पारंपरिक देव-देवता, धार्मिक विधी आणि पूजापरंपरांचे दर्शन घडविण्यात येणार असून, सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विविध पारंपरिक नृत्य, गायन व वादनाचे सादरीकरण होईल. सायंकाळी ६ वाजता वनगर्जना – स्टोरी ऑफ राणी दुर्गावती अँड बिरसा मुंडा या विशेष नाटिकेद्वारे ऐतिहासिक शौर्यगाथा सादर केली जाणार आहे.
१५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचा मुख्य सोहळा उत्साहात साजरा होणार आहे. त्यांच्या जल, जंगल आणि जमीन संरक्षणासाठी तसेच आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी दिलेल्या संघर्षाचे स्मरण करून अभिवादन करण्यात येणार आहे.
दरम्यान, कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी १३ नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथे भेट देऊन पत्रकार परिषदेत आयोजनाची माहिती दिली. माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मंत्री डॉ. उईके, डॉ. अशोक नेते, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक एम. रमेश आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी बिरसा मुंडा कला मंचाची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.
भगवान बिरसा मुंडा यांचे विचार आणि संघर्ष नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासह आदिवासी समाजाची सांस्कृतिक अस्मिता, स्वाभिमान आणि ऐतिहासिक वारशाचे जतन करणे हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी बांधव, महिला, युवक-युवती आणि नागरिकांनी १४ व १५ नोव्हेंबर रोजी जिल्हा संकुल क्रीडा मैदानावर मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन माजी खासदार डॉ. अशोक नेते यांनी केले आहे.




Petrol Price




