पिकांना पाणी देण्याआधीच संकट : अंधारी नदीकाठच्या दहा शेतकऱ्यांचे केबल चोरीला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपुर : शेतातील उभ्या पिकांना पाणी देण्यासाठी अंधारी नदीच्या काठावर लावलेल्या विद्युत मोटारींचे केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने दहा शेतकऱ्यांवर ऐन हंगामात मोठे संकट ओढवले आहे. तब्बल २४ हजार ४०० रुपये किमतीचे केबल चोरीला गेल्याने शेतकऱ्यांची पिकांना पाणी देण्याची व्यवस्था ठप्प झाली असून, चोरट्यांच्या या कृत्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
पोभूर्णी येथील शास्त्रीनगर वॉर्ड क्रमांक १७ मधील निलेश आनंदराव बावणे (३९) यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बावणे यांची अंधारी नदीच्या काठावर पुलाजवळ विद्युत मोटार असून, सन २०१५ पासून या मोटारीच्या माध्यमातून ते आपल्या शेतातील पिकांना पाणी देत होते. याच परिसरात अन्य शेतकऱ्यांनीही आपल्या शेतासाठी विद्युत मोटारी लावलेल्या आहेत.
१८ सप्टेंबर रोजी बावणे हे कामानिमित्त ब्रह्मपुरी येथे गेले होते. दरम्यान, कृष्णा विठ्ठल वासेकर हे शेताकडे गेले असता नदीकाठावर लावलेल्या मोटारीचे केबल दिसून आले नाही. अज्ञात व्यक्तीने कटरच्या साहाय्याने मोटारीला जोडलेले केबल कापून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ बावणे यांना फोन करून घटनेची माहिती दिली.
यानंतर १९ सप्टेंबर रोजी सकाळी शेतकऱ्यांनी नदीकाठावर जाऊन पाहणी केली असता एक-दोन नव्हे, तर तब्बल दहा शेतकऱ्यांच्या मोटारींचे केबल गायब असल्याचे समोर आले. सलीम अहमद शब्बीर अहमद कुरेशी यांचे २२० फूट, रोशन शंकराव बुरांडे यांचे ६० फूट, मारोती गोसाई पिदुरकर यांचे ८० फूट, आनंदराव सोमाजी बावणे यांचे ८० फूट, गुलाब मालिकचंद उराहे यांचे १०० फूट, नलुजी राजेश्वर गुरुतुले यांचे १०० फूट, योगेश्वर भौकाजी गुरुतुले यांचे १०० फूट, जिजा नामदेव हेंडे यांचे १८० फूट, गंगाधर काकडे यांचे ८० फूट आणि ढाडुजी दुधबडे यांचे १५० फूट केबल चोरीला गेले.
या सर्व केबलची एकूण किंमत सुमारे २४ हजार ४०० रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. १७ सप्टेंबरच्या सायंकाळी ७ वाजेपासून १९ सप्टेंबरच्या सकाळी ८ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरी झाल्याचा अंदाज आहे.
शेतकऱ्यांसाठी मोटार आणि तिचे केबल म्हणजे उभ्या पिकांना जगविण्याचा आधार असतो. मात्र, चोरट्यांनी हाच आधार हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांसमोर पिकांना पाणी देण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे. ऐन शेतीच्या हंगामात झालेल्या या चोरीमुळे शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान वाढण्याची भीती असून, अज्ञात चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे. याप्रकरणी पोभूर्णी पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे.




Petrol Price




