महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, २२ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथील हॉटेल ब्ल्यू वॉटर, सी सर्वे नंबर-४, बीआरटीएस औधं-रावेत रोड, पुनावळे, पिंपरी-चिंचवड येथे उत्साहात संपन्न झाली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा माजी खासदार रामदासजी तडस यांच्या मार्गदर्शनाखाली या सभेचे आयोजन करण्यात आले.
या वार्षिक सर्वसाधारण सभेत मागील सभेच्या इतिवृत्तास मंजुरी देण्यासह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक मिळविणाऱ्या महाराष्ट्रातील कुस्तीगीरांचे अभिनंदन, आगामी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील कुस्तीगीरांच्या सहभागाबाबत नियोजन, राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा तसेच महाराष्ट्र केसरी व महाराष्ट्र केसरी महिला किताब लढतींच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली.
तसेच सन २०२६-२७ या वर्षात आयोजित करण्यात येणाऱ्या १५, १७ व २० वर्षांखालील फ्रीस्टाईल, ग्रीकोरोमन व महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धांच्या आयोजनाबाबतही सविस्तर चर्चा करून विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या मिशन लवबेध योजनेबाबत तसेच अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर आलेल्या विषयांवरही सभेत चर्चा करण्यात आली.
या सभेला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्यकारी अध्यक्ष संदीपभाऊ भोंडवे,सरचिटणीस योगेशजी दोडके, विदर्भ अध्यक्ष तिरतकर साहेब, गडचिरोली जिल्हाध्यक्ष तथा संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या.पुणे इंजि. प्रमोदजी पिपरे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष धर्मशिक काटकर यांच्यासह महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष व कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी गडचिरोली जिल्हा जिल्हाध्यक्ष तथा संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या.पुणे इंजि. प्रमोदजी पिपरे यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदासजी तडस साहेब यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. सभेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कुस्तीच्या विकासाला अधिक गती देणे, कुस्तीगीरांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच आगामी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी प्रभावी नियोजन करण्याचा निर्धार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी संघटनेच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.




Petrol Price




