बल्लारपूर प्रोटीन कंपनी परिसरात बिबट्याचा वावर : कर्मचाऱ्यांमध्ये भीती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बामणी येथील वर्षांपासून बंद असलेल्या बल्लारपूर प्रोटीन कंपनीच्या तब्बल ४२ एकर परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरातील कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. २१ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ११ वाजता कंपनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाल्याने खळबळ उडाली.
कंपनी मागील चार वर्षांपासून बंद असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात झुडपे आणि गवत वाढले आहे. त्यामुळे हा परिसर बिबट्यासाठी सुरक्षित अधिवास ठरत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, दिवसाढवळ्या बिबट्या परिसरात फिरताना सीसीटीव्हीत कैद झाल्याने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कंपनी परिसराच्या देखरेखीसाठी चौकीदार आणि काही कर्मचारी तैनात असतात. अशा परिस्थितीत बिबट्याचा वावर त्यांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतो. अचानक बिबट्याशी सामना झाल्यास गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कंपनी परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती वन विभागाला देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, बिबट्याच्या हालचाली लक्षात घेता वन विभागाने तातडीने परिसराची पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
दिवसा बिबट्या कंपनी परिसरात आढळून येणे ही गंभीर बाब मानली जात आहे. त्यामुळे बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅप लावणे, नियमित गस्त वाढविणे आणि परिसरातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक सूचना देणे गरजेचे आहे.
सीसीटीव्हीत बिबट्या कैद झाल्यानंतर आता वन विभाग आणि प्रशासन याप्रकरणी कोणती तातडीची पावले उचलते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.




Petrol Price




