महत्वाच्या बातम्या

 तान्हा पोळ्यात बालगोपालांचा जल्लोष : नंदीबैल सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : तान्हा पोळ्यानिमित्त शहरातील विविध भागांत आयोजित नंदीबैल सजावट स्पर्धांना बालगोपालांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत चिमुकल्यांनी आकर्षक सजावट केलेले नंदीबैल घेऊन स्पर्धेत सहभाग नोंदविला. बालकांच्या उत्साहामुळे परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.

विवेकनगर येथील राममंदिर, पोलीस लाईन तुकूम, एकता चौकातील श्री हनुमंत बाल गणेश मंडळ तसेच सरकारनगर चव्हाण कॉलनी परिसरातील सार्वजनिक गणेश मंदिरात ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले. नगरसेवक अभिषेक डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात नंदीबैल सजावट स्पर्धा घेण्यात आली.

एकता चौकातील श्री हनुमंत बाल गणेश मंडळाच्या स्पर्धेत अद्विक नांदे याने प्रथम क्रमांक पटकावला. त्याला नगरसेवक अभिषेक डोईफोडे, रोहित वसाके व गणेश कावळे यांच्या हस्ते सायकल देऊन गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांकाचे ३ हजार १ रुपयांचे पारितोषिक प्रियांशू बुरांडे याने मिळविले. हे पारितोषिक नेहरू शामुगवेल यांच्यातर्फे देण्यात आले. तृतीय क्रमांकाचे २ हजार १ रुपयांचे पारितोषिक कनक रघाताटे याने पटकावले. हे पारितोषिक सचिन रामटेके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

विवेकनगर येथील राममंदिरातही विजेत्या बालकांना चषक व रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. सरकारनगर चव्हाण कॉलनीतील स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला सायकल, तर द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना रोख पारितोषिक देण्यात आले.

पोलीस लाईन तुकूम येथील स्पर्धेतील विजेत्यांनाही नगरसेवक अभिषेक डोईफोडे, प्रभारी पोलीस उपअधीक्षक तांबडे, राखीव पोलीस निरीक्षक किसन नवघरे, राखीव पोलीस उपनिरीक्षक अनिल वासेकर, पोलीस हवालदार विष्णू नागरगोजे आणि पोलीस दलाचे प्रशिक्षक तुमसरे यांच्या हस्ते चषक प्रदान करून गौरविण्यात आले.

बालगोपालांनी पारंपरिक वेशभूषा, रंगीबेरंगी सजावट आणि आकर्षक नंदीबैलांसह स्पर्धेत सहभाग घेतला. त्यांच्या उत्साहाला प्रोत्साहन देण्यासाठी पोलीस कर्मचारी तसेच नागरिकांची मोठी उपस्थिती होती. तान्हा पोळ्याच्या निमित्ताने पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.





  Print






Related Photos