आष्टी येथे बंद घर फोडले : १ लाख ८३ हजारांचा ऐवज


- कुलूप तोडून घरात प्रवेश; सोन्याचे दागिने व अन्य साहित्य चोरीस, अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि अन्य साहित्य असा एकूण १ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शुक्रवारी ४ सप्टेंबर दुपारी उघडकीस आली. घरमालक दाम्पत्य बाहेरगावी गेले असल्याची संधी साधून चोरट्यांनी घर फोडल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे आष्टी परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विलास गजानन बंडावार ६७ वर्ष, रा. आष्टी, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली हे २० ऑगस्ट रोजी पत्नीसमवेत डोळ्याच्या ऑपरेशनसाठी गडचिरोली येथे गेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. घरात कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघड -
बंडावार दाम्पत्य ४ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे १२ वाजता घरी परतले. यावेळी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळून आले. घरात प्रवेश केल्यानंतर पाहणी केली असता सामान अस्ताव्यस्त असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
घरातील लाकडी पेटी तसेच लोखंडी आलमारी तपासली असता त्यातील सोन्याचे दागिने आणि अन्य साहित्य चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. चोरीस गेलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ८३ हजार रुपये असल्याचे बंडावार यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल -
चोरीची घटना लक्षात आल्यानंतर विलास बंडावार यांनी आष्टी पोलिस ठाण्यात याबाबत तोंडी रिपोर्ट दिला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घराचा पंचनामा करण्यात आला असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्याने चोरीपूर्वी घर बंद असल्याची माहिती त्यांना होती का, यासह विविध शक्यतांचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.
चोरीस गेलेल्या मुद्देमालाचा शोध घेण्याबरोबरच अज्ञात आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.पोलिस निरीक्षक महेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शेळके पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, बंद घराला लक्ष्य करून झालेल्या या घरफोडीमुळे परिसरातील नागरिकांमध्येही चिंता निर्माण झाली आहे.




Petrol Price




