बायोगॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून वायुगळती : अग्निशमन दलाच्या तत्परतेने अनर्थ टळला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : ३० बायोगॅस सिलिंडर घेऊन जाणाऱ्या टाटा आयशर ट्रकमधून अचानक वायुगळती सुरू झाल्याने शनिवारी दुपारी कळमना रोडवरील टिपू सुलतान चौक परिसरात एकच खळबळ उडाली. ट्रकमधून गॅस गळत असल्याचा तीव्र वास जाणवताच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, वेळीच अग्निशमन दलाला माहिती देण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
भांडेवाडी येथील सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट कंपनीकडून बायोसीएनजी (बायोगॅस) गॅसचे सिलिंडर घेऊन टाटा आयशर ट्रक क्र. एमएच ४० डीसी ५११४ काटोलच्या दिशेने निघाला होता. ट्रकमध्ये एकूण ३० बायोगॅस सिलिंडर लोड करण्यात आले होते.
ट्रक टिपू सुलतान चौकाजवळ पोहोचला असता चालकासह परिसरातील नागरिकांना ट्रकमधून गॅस गळत असल्याचा तीव्र वास आला. सिलिंडरमधून वायुगळती होत असल्याचे लक्षात येताच नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. सिलिंडरची संख्या मोठी असल्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन तातडीने अग्निशमन दलाला घटनेची माहिती देण्यात आली.
माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. गर्दीच्या परिसरात गॅसगळती सुरू असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पथकाने तातडीने ट्रक जवळच्या मोकळ्या मैदानात हलविला. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आवश्यक ती खबरदारी घेत ट्रकमधील सर्व ३० बायोगॅस सिलिंडर सुरक्षितपणे खाली केले. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यात यश आले.
अग्निशमन दलाच्या तत्पर आणि योग्य वेळी केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला. सिलिंडर सुरक्षितपणे खाली केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. घटनेमुळे काही काळ टिपू सुलतान चौक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.




Petrol Price




