महत्वाच्या बातम्या

 खड्ड्यांमुळे धोकादायक बनलेला बल्लारपूर-बामणी मार्ग : तातडीने दुरुस्तीचे निर्देश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : चंद्रपूर–आलापल्ली महामार्गावरील बल्लारपूर शहरातील पेपरमिल गेट ते मॉन्टफोर्ट स्कूल, बामणीदरम्यान पडलेल्या मोठ्या खड्ड्यांची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित टोल रस्ता कंपनीला तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा वैशाली जोशी यांच्या नेतृत्वात ५ ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबत निवेदन देण्यात आले होते. या मार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनचालक व नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असून अपघाताचा धोका निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले होते.

या निवेदनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम उपविभाग, भद्रावतीचे सहाय्यक कार्यकारी अभियंता ज. ओ. तिवारी यांनी वरोरा–चंद्रपूर–बल्लारपूर टोल रोड कंपनीला पत्र पाठवून पेपरमिल गेट ते मॉन्टफोर्ट स्कूल, बामणी या संपूर्ण मार्गाची तातडीने पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मार्गावरील सर्व खड्डे व रस्त्यावरील दोषांची नोंद घेऊन ते योग्य तांत्रिक पद्धतीने व दर्जेदार साहित्याचा वापर करून तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दुरुस्तीच्या वेळी योग्य वाहतूक व्यवस्थापन, इशारा फलक, बॅरिकेडिंग आणि आवश्यक रस्ता सुरक्षा उपाययोजना करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. करण्यात आलेल्या कार्यवाहीचा छायाचित्रांसह अनुपालन अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

भाजप महिला आघाडीने केलेल्या निवेदनाची प्रशासनाने दखल घेतल्याने रस्त्याच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला असून, नागरिक व वाहनचालकांना लवकरच दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.





  Print






Related Photos