महत्वाच्या बातम्या

 ऑटोचालकांच्या समस्येवर आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा तातडीने हस्तक्षेप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर बसस्थानक परिसरात स्थानिक ऑटोचालकांना ऑटो उभे करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने निर्माण झालेल्या समस्येवर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने दखल घेतली. त्यांच्या निर्देशानंतर संबंधित अधिकारी आणि ऑटो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन समस्येवर तोडगा काढण्यात आला. त्यामुळे स्थानिक ऑटोचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बल्लारपूर बसस्थानक परिसरात नव्या पाच बसगाड्यांच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. यावेळी स्थानिक ऑटोचालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बसस्थानक परिसरात ऑटो उभे करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे उद्भवणाऱ्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. जागेअभावी ऑटोचालकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला असून, दुसरीकडे शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा परिणाम होत असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

ऑटोचालकांची समस्या ऐकून घेत आमदार मुनगंटीवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यांनी विधानसभा बल्लारपूर बांधकाम कामगार समितीचे सहअध्यक्ष तथा भाजपचे माजी शहर अध्यक्ष काशीनाथ सिंह यांना संबंधित एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश दिले.

आमदारांच्या निर्देशानंतर काशीनाथ सिंह यांनी एस.टी. महामंडळाचे अधिकारी तसेच ऑटो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत ऑटोचालकांना येणाऱ्या अडचणी, बसस्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्था आणि ऑटो उभे करण्यासाठी आवश्यक जागा याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर ऑटो संघटनेच्या समस्येवर तोडगा काढण्यात आला.

समस्येचे निराकरण झाल्यानंतर स्थानिक ऑटोचालक संघटनेच्या सदस्यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले. तसेच काशीनाथ सिंह यांनी केलेल्या सकारात्मक आणि तातडीच्या प्रयत्नांबद्दलही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी ऑटो संघटनेच्या वतीने सचिन ईश्वर, अंबादे, फईम बब्बूसेख, प्रतीक चरणदास मून, प्रवीण बामन दुबे, मोहम्मद सरफराज, श्रीनिवास गुडेट्टी, भूषण मालखेड़े, सचिन राजौरा, नितीन निवलकर, सुनील वासेकर यांच्यासह ऑटोचालक व मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos