महत्वाच्या बातम्या

 रेल्वेतील मोबाईल चोरी करणारा सराईत चोर बोटटूट्या अटकेत : आयफोनसह सहा मोबाईल हस्तगत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : आंध्र प्रदेश एक्सप्रेसमधील प्रवाशाचा चोरीस गेलेला आयफोन-१६ मोबाईल शोधून काढत रेल्वे पोलिसांनी चंद्रपूर शहरातील एका सराईत मोबाईल चोराला अटक केली आहे. आरोपीकडून विविध कंपन्यांचे एकूण सहा मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून त्यांची अंदाजे किंमत १ लाख ८६ हजार रुपये आहे. श्रीकांत उर्फ बोट टुट्या राजू चुनारकर  २३ वर्षे  रा. महाकाली कॉलरी  आनंद नगर चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑगस्ट रोजी ट्रेन क्रमांक २०८०६ आंध्र प्रदेश एक्सप्रेस चंद्रपूर रेल्वे स्थानकावरून सुटल्यानंतर एका प्रवाशाचा आयफोन-१६ मोबाईल चोरीला गेला होता. या घटनेप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी चंद्रपूर शहरातील महाकाली कॉलरी परिसरात सापळा रचून श्रीकांत उर्फ बोट टुट्या राजू चुनारकर  २३वर्षे याला रेल्वे पटरीजवळून ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपीकडून विविध कंपन्यांचे एकूण सहा मोबाईल फोन जप्त करण्यात आले. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे १ लाख ८६ हजार रुपये आहे. जप्त मोबाईलमध्ये पांढऱ्या रंगाचा आयफोन-१६ कॅमेरा फुटलेला व डिस्प्ले खराब असून त्याची अंदाजे किंमत ७२ हजार रुपये आहे. आरोपीने हा मोबाईल ३ ऑगस्ट रोजी आंध्र प्रदेश एक्सप्रेसमधून चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली. सखोल तपासात हा आयफोन जीआरपी वर्धा येथे भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०५(सी) अंतर्गत दाखल गुन्हा क्रमांक २२०/२०२६ मधील चोरीचा असल्याचे निष्पन्न झाले. तसेच आरोपीने मागील काही दिवसांपासून चंद्रपूर रेल्वे स्थानकावर येणाऱ्या विविध रेल्वेगाड्यांमधून मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली असून, या अनुषंगाने पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सदर कारवाई रेल्वे पोलीस अधीक्षक डॉ. मंगेश शिंदे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी जीआरपी नागपूरचे पोलीस निरीक्षक पंजाबराव डोळे, जीआरपी वर्धाचे पोलीस निरीक्षक विरसेन चहांदे तसेच आरपीएफ चंद्रपूरचे थाना प्रभारी अमावत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस शिपाई अखिलेश चौधरी, संजय सुखदेव, पंकज भांगे, दर्शन झाडे, राजेंद्र फटिंग सर्व जीआरपी वर्धा, पोलीस शिपाई निलेश निकोडे एलसीबी जीआरपी नागपूर आणि सहाय्यक उपनिरीक्षक मंगेश पायघन सीआयबी आरपीएफ नागपूर यांनी केले.दरम्यान, रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना रेल्वे प्रवासादरम्यान आपल्या मोबाईलसह मौल्यवान वस्तू आणि सामानाची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos