महत्वाच्या बातम्या

 ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई : बारफोडी करणारी अट्टल टोळी जेरबंद, १९.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : स्थानिक बारचे शटर वाकवून महागडी विदेशी दारू आणि इतर साहित्य चोरी करणाऱ्या अट्टल टोळीचा ब्रह्मपुरी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पर्दाफाश केला आहे. सोमवारी ३ आगस्ट करण्यात आलेल्या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली तीन वाहने असा एकूण १९ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सौरभ अनिल वाघाडे रा. बामणी, जगदीश दीपक शेंडे रा. नागभीड, अभिषेक अशोक अलोने रा. कुनघाडा चक आणि विशाल दिवाकर ठाकरे रा. मांगली अरब यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी रात्रीच्या वेळी बारचे शटर वाकवून आत प्रवेश करत असे. त्यानंतर बारमधील महागडी विदेशी दारू तसेच इतर साहित्य चोरी करून आरोपी पसार होत होते. या टोळीने सुमारे पंधरा दिवसांपूर्वी ब्रह्मपुरी आणि खरकाडा येथील दोन बारमध्ये चोरी केल्याची कबुली चौकशीदरम्यान दिली आहे.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना ब्रह्मपुरी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला. सापळा रचून चौघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली तीन वाहनेही जप्त करण्यात आली.

या कारवाईमुळे बारफोडीच्या घटनांचा उलगडा झाला असून पोलिसांनी एकूण १९ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळविले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शोध पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मनोज खडसे करीत आहेत.

या यशस्वी कारवाईमुळे ब्रह्मपुरी व परिसरातील मालमत्तेविरोधातील गुन्ह्यांवर आळा बसण्यास मदत होणार असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या इतर आरोपींचाही शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos