जिल्हा युवा पुरस्कार करिता अर्ज आमंत्रित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यातील युवक-युवतींनी समाजहितासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव व्हावा आणि युवा विकासासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने जिल्हा युवा पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येतो. सन २०२५-२०२६ या वर्षासाठी या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे ३१ जुलै या कालावधीत अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पूर्णपणे भरलेले अर्ज ३१ जुलै पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात स्वीकारले जाणार आहेत. जिल्हा युवा पुरस्कार युवक व युवती यांना स्वतंत्रपणे तसेच एका नोंदणीकृत संस्थेला प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कारामध्ये गौरवपत्र, सन्मानचिन्ह आणि प्रती युवक व युवतींसाठी प्रत्येकी १० हजार रुपयांची रोख रक्कम, तर संस्थेसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह आणि ५० हजार रुपयांची रोख रक्कम देण्यात येणार आहे.
पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या युवक, युवती किंवा संस्थेने महाराष्ट्रातील संबंधित जिल्ह्यात सलग किमान पाच वर्षे वास्तव्यास असणे आवश्यक आहे. अर्जदार युवक अथवा युवतीचे वय पुरस्कार वर्षातील १ एप्रिल रोजी किमान १३ वर्षे पूर्ण आणि पुढील ३१ मार्चपर्यंत ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
अर्जासोबत समाजोपयोगी कार्याचे सर्व पुरावे जोडणे बंधनकारक राहील. यामध्ये वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, छायाचित्रे आणि अन्य कागदपत्रांचा समावेश असू शकतो. पुरस्कारप्राप्त युवक, युवती अथवा संस्थेने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्षे समाजोपयोगी कार्य सुरू ठेवण्याबाबत हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे. एका जिल्ह्यात पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीस राज्यातील इतर जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करता येणार नाही.
संस्थांच्या बाबतीत संबंधित संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम अथवा मुंबई पब्लिक ट्रस्ट अॅक्ट, १९५० अंतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. संस्थेची नोंदणी झाल्यानंतर किमान पाच वर्षे कार्यरत असणे बंधनकारक असून, संस्थेच्या सदस्यांचे संबंधित पोलीस स्टेशनकडून प्रमाणित चारित्र्य दाखले देणे आवश्यक आहे. पुरस्कारासंदर्भातील अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम यांनी केले आहे.
News - Wardha




Petrol Price




