महत्वाच्या बातम्या

 धावत्या दुचाकीने अचानक घेतला पेट : सुझुकी जिक्सर जळून खाक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : चंद्रपूरहून बल्लारपूरकडे येत असताना एका दुचाकीला अचानक आग लागून ती पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास दर्गा परिसरात घडली. सुदैवाने वाहनचालकाने प्रसंगावधान राखल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, बल्लारपूर येथील एलआयसीमध्ये कार्यरत असलेले सुशील विजय टाले हे त्यांच्या सुझुकी जिक्सर क्र. एमएच-४९ बीएस-५२६५ या दुचाकीने चंद्रपूरहून बल्लारपूरकडे येत होते. दर्गा परिसरात पोहोचल्यावर दुचाकीतून धूर निघत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ वाहन रस्त्याच्या कडेला थांबवून तपासणी करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, काही क्षणांतच दुचाकीने अचानक पेट घेतला आणि आगीने विक्राळ रूप धारण केले. आग इतक्या वेगाने पसरली की संपूर्ण दुचाकी ज्वाळांच्या भक्ष्यस्थानी पडून जळून खाक झाली. त्यात त्यांचे १ लाख ५० हजार रुपयांचा नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक जवानांनी तत्काळ आग आटोक्यात आणून पुढील धोका टाळला. मात्र तोपर्यंत दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

प्राथमिक माहितीनुसार, वाहनातील तांत्रिक बिघाड किंवा शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे काही काळ परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती.





  Print






News - Chandrapur




Related Photos