किरमिरी शिवारात पुन्हा बिबट्याचे दर्शन : चार मेंढ्यांच्या हल्ल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : तालुक्यातील किरमिरी गावालगत रामटेके यांच्या शेतात मंगळवारी बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच याच बिबट्याने चार मेंढ्यांवर हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना घडली होती. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामस्थांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रामटेके यांच्या शेतात बिबट्या फिरताना दिसून आला. ही माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरताच नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. काही दिवसांपासून बिबट्याचा या परिसरात वावर असल्याची चर्चा असून, दोन दिवसांपूर्वी त्याने चार मेंढ्यांवर हल्ला करून त्यांना ठार केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आधीच भीतीचे वातावरण होते. त्यात पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
सध्या परिसरात धान रोवणी, कापूस पिकावर फवारणी तसेच मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे शेतकरी आणि शेतमजूर सकाळपासून सायंकाळपर्यंत शेतात काम करत असतात. अशा परिस्थितीत बिबट्याचा मुक्त वावर सुरू असल्याने मानवी जीविताला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक शेतकरी भीतीच्या छायेत शेतीची कामे करत असून, महिलांनाही आणि शेतमजुरांनाही एकट्याने शेतात जाणे धोकादायक वाटत आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अलर्ट मोडवर काम सुरू केले आहे. वन कर्मचाऱ्यांकडून परिसरात पाहणी केली जात असून बिबट्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, एकट्याने शेतात किंवा जंगलालगतच्या भागात जाऊ नये आणि बिबट्याचे दर्शन झाल्यास तातडीने वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, परिसरात पिंजरा लावावा आणि शेतकरी तसेच ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी किरमिरी गावातील नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे. बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम असून वनविभागाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
News - Chandrapur




Petrol Price




