अमली पदार्थांविरोधात चंद्रपूर पोलिसांची विशेष टिपलाईन : कॉल किंवा व्हॉट्सॲपवरून देता येणार गुप्त माहिती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात अमली पदार्थांच्या वाढत्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी चंद्रपूर पोलीस प्रशासनाने नागरिकांच्या सहभागातून मोठे अभियान सुरू केले असून, त्यासाठी ७८८७८९०१०० हा विशेष टिपलाईन मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. या क्रमांकावर नागरिकांना थेट कॉल करून किंवा व्हॉट्सअॅपद्वारे अमली पदार्थांच्या खरेदी-विक्री, सेवन, साठा किंवा इतर संशयास्पद हालचालींबाबत माहिती देता येणार आहे. विशेष म्हणजे माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव व ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असल्याची हमी पोलीस प्रशासनाने दिली आहे.
चंद्रपूर जिल्हा अमली पदार्थमुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना, जनजागृती अभियान तसेच विशेष कारवाया राबविण्यात येत आहेत. या मोहिमेचा भाग म्हणून शाळा, महाविद्यालय परिसर तसेच शहर आणि ग्रामीण भागातील संशयित ठिकाणांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने ही विशेष टिपलाईन सुरू करण्यात आली आहे.
या टिपलाईनवर नागरिक, विद्यार्थी, पालक किंवा कोणतीही जबाबदार व्यक्ती थेट फोन करून माहिती देऊ शकते. तसेच व्हॉट्सअॅपवर मेसेज, छायाचित्रे किंवा व्हिडिओ पाठवूनही अमली पदार्थांशी संबंधित संशयास्पद घटनांची माहिती पोलिसांना कळवता येणार आहे. मिळालेल्या माहितीची गोपनीय पडताळणी करून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचविण्यासाठी समाजातील प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्त्वाची आहे. आपल्या परिसरात किंवा शैक्षणिक संस्थांच्या आसपास अमली पदार्थांचे सेवन, विक्री, साठा किंवा इतर कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता ७८८७८९०१०० या टिपलाईन क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा.
अमली पदार्थांच्या विरोधातील लढ्यात नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असून, समाजाच्या सहभागातूनच जिल्ह्यातील अमली पदार्थांचे जाळे उद्ध्वस्त करण्याचा निर्धार चंद्रपूर पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे. तसेच मिळालेल्या प्रत्येक माहितीवर संवेदनशीलतेने कार्यवाही करण्यात येईल आणि माहिती देणाऱ्याची ओळख कोणत्याही परिस्थितीत उघड केली जाणार नाही, अशी ग्वाहीही पोलिसांनी दिली आहे.
News - Chandrapur




Petrol Price




