महत्वाच्या बातम्या

 सोडे येथील शासकीय आश्रम शाळेला जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांची अचानक भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी धानोरा तालुक्यातील सोडे येथील शासकीय आश्रम शाळेला अचानक भेट देऊन शाळेची पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक, निवासी व दैनंदिन सुविधांची माहिती जाणून घेतली.

भेटीदरम्यान त्यांनी आश्रम शाळेतील स्वच्छता, विद्यार्थ्यांच्या भोजन व्यवस्थेची पाहणी केली तसेच विद्यार्थ्यांना वेळेवर व दर्जेदार आहार मिळत आहे की नाही, याची सविस्तर माहिती घेतली. आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, सुरक्षित वातावरण आणि सर्व आवश्यक सुविधा मिळाव्यात यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहू, असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

पाहणीदरम्यान आश्रम शाळेत शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आवश्यक मनुष्यबळाच्या अभावामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर व दैनंदिन सुविधांवर परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सर्व समस्या शासनाच्या निदर्शनास आणून त्या तातडीने सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आश्रम शाळांमध्ये आवश्यक सुविधा, पुरेसे शिक्षक व कर्मचारी उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी असून, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी कोणतीही तडजोड होऊ नये, अशी ठाम भूमिका जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी व्यक्त केली.

यावेळी माजी जि. प. सदस्य विनोद लेनगुरे, नगरसेवक रमेश चौधरी, गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, सरपंच संजय गावडे, उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos