आ. मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : राज्याचे माजी मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले हिंदी उर्दू तेलुगू विद्यालय येथे विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक पुस्तकांचे वितरण करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला शिक्षक, विद्यार्थी व मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष ताजने होते. प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पक्षाचे दक्षिण भारतीय आघाडी चे माजी जिल्हाध्यक्ष मनीष रामिल्ला, पत्रकार ज्ञानेंद्र आर्य, शिक्ष रवि, लक्ष्मणराव तसेच शिक्षिका हेमलता उपस्थित होते.
यावेळी मनीष रामिल्ला यांनी आपल्या मनोगतात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर मतदारसंघात राबविलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. शिक्षण, पायाभूत सुविधा, नागरिकांच्या सोयी-सुविधा आणि सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण कामे पूर्ण करण्यात आली असून, मतदारसंघातील उर्वरित विकासकामेही लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी विकासाचा वेग कायम ठेवला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक पुस्तकांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचे उज्ज्वल भविष्य घडवावे, समाजात आदर्श नागरिक म्हणून योगदान द्यावे, अशा शुभेच्छा मान्यवरांनी यावेळी दिल्या.
कार्यक्रमाचे नियोजन शाळा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित पालकांनी या उपक्रमाचे स्वागत करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या अशा सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले.
News - Chandrapur




Petrol Price




