गुरु पौर्णिमा उत्सवात कपडे, वृक्षरोपांचे वाटप : विद्यार्थ्यांसाठी मोफत शिकवणी वर्गाचा शुभारंभ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : वरोरा तालुक्यातील सेंबळ येथील साईबाबा मंदिर तसेच बालाजी वॉर्ड, बल्लारपूर येथील साईबाबा मंदिरात यंदाही गुरु पौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात विविध सामाजिक उपक्रमांसह उत्साहात साजरा करण्यात आला. उत्सवानिमित्त भजन, कपडे वाटप, वृक्षरोपांचे वितरण तसेच इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शिकवणी वर्गाचा शुभारंभ करण्यात आला.
२८ व २९ जुलै रोजी सेंबळ येथील साईबाबा मंदिरात पाच भजन मंडळांनी दिवसरात्र भजन सेवा सादर केली. २९ जुलै रोजी सकाळी साईबाबांच्या आरतीने मुख्य कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी मोफत शिकवणी वर्गाच्या शिक्षिका कु. प्रतीक्षा दिनेश जिवतोडे यांचा शांता जरीले यांच्या हस्ते शाल, साडी व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ज्येष्ठ नागरिक मोतीराम वाटेकर व सांबा काळे यांचाही शाल, श्रीफळ व वस्त्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात ३५० साड्या, ब्लँकेट, धोतर व इतर मिळून सुमारे १,००० कपड्यांचे वाटप करण्यात आले. तसेच १०० आंब्याची रोपे आणि इतर फळझाडांची मिळून १५० वृक्षरोपे ग्रामस्थांना वितरित करण्यात आली.
पांडुरंग जरीले यांनी स्वर्गीय उद्धवराव जरीले व सोनाबाई जरीले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शिकवणी वर्गाचा शुभारंभ केला. या वर्गासाठी शिक्षिका प्रतीक्षा जिवतोडे यांना दरमहा मानधन देण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास व सुसंस्कारांचे मार्गदर्शनही दिले जाणार आहे.
या कार्यक्रमाला डॉ. हेमा खापणे, विनायकराव साळवे, शांता जरीले, साई पिल्ले, ललित पिल्ले, प्रशांत मेश्राम, नगरसेवक मनोज बेले, गुलाबराव (मनोज) जिवतोडे, प्रफुल्ल जिवतोडे, प्रमोद जिवतोडे व अन्य मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
News - Chandrapur




Petrol Price




