महत्वाच्या बातम्या

 सायबर फसवणूक आणि अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करा : गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : सायबर फसवणूक, अंमली पदार्थांची तस्करी, वाहतूक, विक्री व सेवन यांसारख्या गंभीर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस यंत्रणेने अधिक सजग राहून ठोस उपाययोजना कराव्यात, असे निर्देश राज्याचे गृह राज्यमंत्री ग्रामीण डॉ. पंकज भोयर यांनी दिले.

चंद्रपूर येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत, पोलिस अधीक्षक आयुष नोपानी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक ईश्वर कातकाडे, सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

डॉ. भोयर यांनी सांगितले की, तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून नागरिकांच्या बँक खात्यांतील रक्कम फसवणुकीद्वारे परस्पर वळविण्याच्या घटना वाढत आहेत. अशा गुन्ह्यांमुळे आर्थिक नुकसानाबरोबरच नागरिकांना मानसिक त्रासही सहन करावा लागतो. त्यामुळे सायबर गुन्ह्यांबाबत व्यापक जनजागृती करण्याबरोबरच त्वरित प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

अंमली पदार्थांच्या तस्करी, विक्री आणि सेवनाला आळा घालण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्याने आपल्या कार्यक्षेत्रात विशेष लक्ष ठेवावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. चंद्रपूर हा औद्योगिक तसेच राज्याच्या सीमेवरील जिल्हा असल्याने गोवंश तस्करी व कत्तलीस प्रतिबंध करण्यासाठी सीमावर्ती तपासणी नाक्यांवर कडक तपासणी करावी. आवश्यकतेनुसार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन करावे तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या नाक्यांना अचानक भेटी देऊन तपासणी करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

गावागावातील पोलिस पाटलांच्या कार्यशाळा घेऊन त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शन करण्यावरही त्यांनी भर दिला. महिला व तरुणींच्या सुरक्षेसाठी दामिनी पथकाने बसस्थानके, रेल्वे स्थानके आणि गर्दीच्या ठिकाणी गस्त वाढवावी, तसेच पोलिसांनी नागरिकांशी सातत्याने संवाद साधून माहिती संकलनाची यंत्रणा अधिक मजबूत करावी, असेही ते म्हणाले.

बैठकीदरम्यान मागील एका महिन्यात पोलिसांनी शोधून काढलेले १०५ हरविलेले मोबाईल फोन गृह राज्यमंत्री डॉ. भोयर यांच्या हस्ते संबंधित नागरिकांना परत करण्यात आले. यामध्ये अनिकेत दुमारकर, प्रेम किटे, मंगेश फटिंग यांच्यासह अनेक लाभार्थ्यांचा समावेश होता.

यावेळी पोलिस अधीक्षक आयुष नोपानी यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील मनुष्यबळ, गुन्हेगारीचे प्रमाण, अपघात व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजना, अंमली पदार्थविरोधी मोहिमा, मोक्का अंतर्गत कारवाया, गोवंश प्रकरणे, तडीपार कारवाई, सायबर गुन्हे, पासपोर्ट पडताळणी, चारित्र्य प्रमाणपत्र वितरण, स्वसंरक्षण प्रशिक्षण आणि वाहतूक जनजागृतीबाबत सविस्तर माहिती दिली.





  Print






News - Chandrapur




Related Photos