पूराच्या पाण्याकडे दुर्लक्ष : बॅरिकेट्स हटवून वाहनधारकांचा जीवघेणा प्रवास

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे खोब्रागडी आणि वैलोचना नदीला पूर आला असून अनेक पुलांवरून पुराचे पाणी वाहू लागले आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महसूल प्रशासन आणि पोलिस विभागाने संबंधित पुलांवर बॅरिकेट्स लावून वाहतूक बंद केली होती. मात्र, प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत काही वाहनधारकांनी बॅरिकेट्स बाजूला करून पुराच्या पाण्यातूनच जीव धोक्यात घालून प्रवास केल्याचे धक्कादायक चित्र ३० जुलै रोजी पाहायला मिळाले.
पुराचे पाणी पुलांवरून वाहत असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक रोखली होती. तरीही अनेक दुचाकी आणि चारचाकी चालकांनी नियमांना केराची टोपली दाखवत बंद करण्यात आलेल्या मार्गावरून प्रवास केला. या बेजबाबदार कृतीमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून प्रशासनाने अशा प्रकारांना आळा घालण्याची गरज व्यक्त होत आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पावसाअभावी रखडलेल्या धान रोवणीच्या कामांना या धुवाधार पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असले, तरी अतिवृष्टीमुळे अनेक ग्रामीण मार्गांची दैना उडाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
वैरागडजवळील पाटनवाडा नाल्याला पूर आल्याने वैरागड–कढोली मार्ग दिवसभर वाहतुकीसाठी बंद राहिला. तसेच वैलोचना नदीच्या पुरामुळे वैरागड–देलनवाडी मार्गावरील संपर्क पूर्णपणे तुटला. करपडा घाटावरील पुलावरही पुराचे पाणी साचल्याने वैरागड–रांगी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
पूरस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्क तात्पुरता खंडित झाला असून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून पुराच्या पाण्यातून प्रवास टाळावा, असे आवाहन महसूल आणि पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




