महत्वाच्या बातम्या

 ग्रामगीता हा ग्रामीण विकासाचा आरसा : अल्का आत्राम


- पंचायत समिती बल्लारपूरमध्ये संतांच्या प्रतिमांचे अनावरण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधत पंचायत समिती बल्लारपूर परिसरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमांचे भव्य अनावरण बुधवारी उत्साहात संपन्न झाले. पंचायत समितीतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्त वर्गणीतून हा उपक्रम साकारत समाजप्रबोधन, ग्रामविकास आणि संतविचारांचा जागर करण्याचा प्रेरणादायी संदेश दिला.

या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या पोंभूर्णा पंचायत समितीचे माजी सभापती अल्काताई आत्राम यांनी, ग्रामगीता हा ग्रामीण विकासाचा आरसा असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामविकास, राष्ट्रनिर्माण, नैतिक मूल्ये आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला. कर्मयोगी संत गाडगेबाबांनी स्वच्छता, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षण आणि निःस्वार्थ समाजसेवेचे कार्य प्रत्यक्ष कृतीतून घडवून दाखविले. त्यांच्या विचारांचा वारसा समाजापर्यंत पोहोचविण्याची आज नितांत गरज आहे, असे प्रतिपादन केले.

यावेळी अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी डॉ. अर्जुन पावरा होते. सहअध्यक्ष म्हणून तहसीलदार रेणुका कोकाटे उपस्थित होत्या. याशिवाय गटविकास अधिकारी धनंजय साळवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी कांबळे, विद्याताई देवाळकर, उपविभागीय अभियंता श्रद्धा जयस्वाल, बाल विकास प्रकल्प अधिकारी शुभांगी वऱ्हाटे, सहाय्यक लेखाधिकारी भेजेंद्र मसराम, विस्तार अधिकारी पंचायत दिलीप बैलंवार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमांचे अनावरण करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पंचायत समितीतील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामूहिक शिवगर्जना व शिवआरती सादर केली. तसेच गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित भजन संध्येमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.

पंचायत समिती अंतर्गत शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास, उमेद अभियान, पशुसंवर्धन, कृषी, बांधकाम, पंचायत तसेच इतर सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी झाले. अधिकारी-कर्मचाऱ्यांमधील एकात्मता, सामाजिक बांधिलकी आणि संतांच्या विचारांप्रती असलेली श्रद्धा अधोरेखित करणारा हा सोहळा प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.





  Print






News - Chandrapur




Related Photos