महत्वाच्या बातम्या

 बजाज विद्या भवनमध्ये गुड टच–बॅड टच विषयावर जनजागृती : २५० विद्यार्थ्यांना बालसुरक्षेचे धडे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरातील बजाज विद्या भवन येथे २८ जुलै २०२६ रोजी जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड लाईनच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी गुड टच–बॅड टच या विषयावर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात लहान मुलांना वैयक्तिक सुरक्षितता, अनुचित स्पर्श ओळखणे तसेच अशा प्रसंगी योग्य ती पावले उचलण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी प्रिया पिंपळशेंडे समुपदेशिका, जिल्हा बाल संरक्षण कक्ष तसेच किरण बोहरा केस वर्कर, चाईल्ड लाईन चंद्रपूर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत चांगला आणि वाईट स्पर्श यातील फरक सोप्या भाषेत समजावून सांगितला. कुणी अनुचित स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्यास भीती न बाळगता त्वरित आई-वडील, शिक्षक किंवा विश्वासू मोठ्या व्यक्तीशी संवाद साधावा तसेच चाईल्ड हेल्पलाईन १०९८ वर संपर्क साधून मदत घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

विद्यार्थ्यांना स्वतःची सुरक्षितता कशी राखावी, चुकीच्या गोष्टींना ठामपणे विरोध करण्याचे महत्त्व तसेच इतर गरजू मुलांनाही मदत करण्याची जबाबदारी याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना कोमल ही जनजागृतीपर चित्रफीत दाखवून संशयास्पद वर्तन करणाऱ्या व्यक्तींची ओळख कशी करावी आणि सतर्क राहण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमात सुमारे २५० विद्यार्थी तसेच १० ते ११ शिक्षकांनी सहभाग घेतला. बालकांच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला.





  Print






News - Chandrapur




Related Photos