महत्वाच्या बातम्या

 शोरूममधील ४.७८ लाखांच्या कृषी अवजारांची चोरी : चार कर्मचाऱ्यांविरुद्ध रामनगर पोलिसांत गुन्हा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : अंजिकर ऑटोमोबाईल शोरूममधून तब्बल ४ लाख ७८ हजार रुपये किमतीच्या कृषी अवजारांची चोरी केल्याप्रकरणी विनयकुमार द्विवेदी (सिक्युरिटी गार्ड ), आफताब शौकत शेख (शोरूम ड्रायव्हर), प्रशांत मुरलीधर मद्देलवार (हेल्पर) आणि उमेश अंकुश गेडाम (हेल्पर) यांच्याविरुद्ध रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी संगनमत करून दीर्घकाळ शोरूममधील साहित्य चोरी करून त्याची विक्री केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी रोहन चंद्रकांत अंजिकर ३९ वर्ष रा. अरविंद नगर, मूल रोड, चंद्रपूर हे नागपूर रोडवरील अंजिकर ऑटोमोबाईल या शोरूमचे मालक असून तेथे ट्रॅक्टर व कृषी अवजारे विक्रीचा व्यवसाय करतात. शोरूममध्ये अनेक कर्मचारी कार्यरत असून सुरक्षा व्यवस्थेसाठी स्वतंत्र सुरक्षा रक्षकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

२४ जुलै रोजी फिर्यादी यांना त्यांचे मित्र अरुणभाई यांनी फोन करून सुरक्षा ठेकेदार विनयकुमार द्विवेदी हा सेकंड हँड ट्रॅक्टर शोरूममध्ये ट्रॅक्टर फ्रंट गार्ड विक्रीसाठी घेऊन आल्याची माहिती दिली. संबंधित फ्रंट गार्ड स्वतःकडून विकत घेतलेला नसल्याचे अरुणभाईंनी सांगितल्यानंतर त्यांनी दाखविलेल्या छायाचित्रांवरून तो फ्रंट गार्ड अंजिकर ऑटोमोबाईलच्या शोरूममधील असल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर शोरूममधील साहित्याचा साठा तपासण्यात आला असता, सन २०२५ पासून २७ जुलै २०२६ पर्यंत एक मोठा रोटावेटर, दोन छोटे रोटावेटर, पाच ट्रॅक्टर फ्रंट गार्ड, तीन कल्टीवेटर, स्वराज कंपनीचे आठ ऑइल बकेट (८.५ लिटर) तसेच दहा रोटावेटर ब्लेड बॉक्स असा एकूण ₹४ लाख ७८ हजार किमतीचा माल कमी असल्याचे आढळून आले.

याबाबत सेल्स एक्झिक्युटिव्ह संदेश चंद्रहास गोवर्धन व सुपरवायझर मनोज चहाकाटे यांच्याकडे चौकशी केली असता, संबंधित चार आरोपींनी संगनमत करून शोरूममधील साहित्य चोरी करून विक्री केल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर विनयकुमार द्विवेदी याची चौकशी केली असता, रात्री गोदाम बंद झाल्यानंतर टाटा एस वाहनातून तसेच काही वेळा दिवसाही माल बाहेर काढून विक्री केल्याची आणि मिळालेली रक्कम आपसात वाटून घेतल्याची कबुली दिल्याचा उल्लेख फिर्यादीच्या तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी रामनगर पोलिसांनी २७ जुलै रोजी आरोपींविरुद्ध कलम ३०६, ३(५) भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos