महत्वाच्या बातम्या

 उनकेश्वर (देवस्थान) येथील शिवलिंगाकार कमळ तलाव हे आंतराष्ट्रीय स्तरावरचे पर्यटन विकासापासून वंचीत : प्रा. संतोष पवार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / घाटंजी : भारत व व्हिएतनाम या देशाचे राष्ट्रीय फूल गुलाबी कमळ (पिंक लोटस) अशा उनकेश्वर येथील लाखो गुलाबी कमळ फुलांचा भव्य तलाव हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे असून आतापर्यंत विकासापासून वंचित राहिलेले आहे. राष्ट्रहिताच्या नजरेतून या तलावाचा विकास होणे आजच्या काळाची गरज आहे. यातून महाराष्ट्र राज्याची एक नवीन ओळख निर्माण होईल, असे प्रा. संतोष गोपीचंद पवार यांनी विचार व्यक्त केला आहे.

धरती आबा बिरसा मुंडा संशोधन व अध्ययन केंद्र, किनवटचे अध्यक्ष प्रा. संतोष गोपीचंद पवार, उपाध्यक्ष बालाजी तोटेवाड, सचिव अँड. साईप्रकाश नार्लावार यांनी आज १० जुलै रोजी तीर्थक्षेत्र उनकेश्वर येथील शिवलिंग आकाराचे भव्य नैसर्गिक राष्ट्रीय गुलाबी कमळ तलावाचा पर्यटन संशोधन अभ्यास दौरा केला. यावेळी त्यांच्या समवेत उनकेश्वर येथील दैनिक देशोन्नतीचे पत्रकार विनोद डवले, सायफळ येथील संतोष देशमुख  यांनी तलावाचा संपूर्ण परिसर दाखवून त्याबद्दलची माहिती पर्यटन संशोधन समितीला प्रत्यक्ष दिली. 

यावेळी प्रा. पवार म्हणाले की, या कमळ तलावाचा परिसर अतिशय सुंदर असून येथे जैवविविधता व वनौषधीने दाट हिरवागार परिसर मनमोहक असून देशातील नामांकित विद्यापीठाने या ठिकाणी आपले पीएचडी संशोधक पाठवावे, कारण येथे भव्य प्रमाणात दुर्मिळ वनौषधी आढळतात तसेच शिक्षणातील वनौषधीची जाण असलेला आदिवासी समाज देखील मोठ्या प्रमाणात या परिसरात राहतो. या कमळ तलाव परिसरात  देशी, विदेशी पक्षी, फुलपाखरे, मोर, वन्य प्राणी, अजगर, ससा, कासव, जळू येथे मोठ्या प्रमाणात आहे. 

जवळपास २५० एकर क्षेत्रफळ असलेल्या या गुलाबी कमळ तलावाचा आज पर्यंत विकास होऊ शकला नाही, ही दुःखाची बाब आहे. तीर्थक्षेत्र उनकेश्वर येथील पैनगंगेच्या तीरावरील नैसर्गिक गुलाबी कमळ भव्य तलाव हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पर्यटन स्थळ असून या स्थळाचा राज्य शासनाने तातडीने बोटनीकल पर्यटन विकास करावा जेणे करून दुर्लक्षित हे पर्यटन स्थळ जगाच्या नकाशावरील येईल. योग दिनासारखे आंतरराष्ट्रीय पातळीवर या गुलाबी कमळ  तलावाचे महत्व वाढून परदेशातील पर्यटकांसाठी हा देशाच्या हिताचा ठरेल, आणि नांदेड जिल्ह्याला आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर नवी ओळख मिळेल असे शेवटी पवार म्हणाले.

शरभंग ऋषी संतांचा पर्यटन विकास होणे गरजेचे - साईप्रकाश नार्लावार -
शरभंग ऋषी आश्रम गरम पाण्याचे झरे असलेले तीर्थक्षेत्र उनकेश्वर हे राम वन गमन मार्ग असून येथील शिव मंदिराचे पौराणिक महत्त्व असून नांदेड जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असल्याने येथील पायाभूत सुविधा पाहिजे तसा विकास पर्यटन विभागाकडून करण्यात आलेला नाही. येथे दररोज हजारो भाविक येत असतांना भाविकांना मूलभूत सुविधा मिळत नाही. 

त्यामुळे हे तीर्थक्षेत्र भकास झाल्यासारखे दिसते. तेव्हा किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी जिल्हा नियोजन समितीकडून तसेच पुरातत्व विभागाकडून पर्यटन विकासाचा आराखडा (मॅजिक प्लॅन) तयार करावा. जेणेकरून इको टुरिझम अधिक वाढेल आणि यातून परिसरातील लोकांना चांगला रोजगार मिळू शकतो, असे धरती आबा बिरसा मुंडा संशोधन व अध्ययन केंद्र, किनवटचे सचिव  ADV. साईप्रकाश नार्लावार यांनी मागणी केली आहे.





  Print






News - Rajy




Related Photos