शालेय बसांना महाराष्ट्र मोटार वाहन (प्रथम सुधारणा) नियम लागू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : शासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित, पारदर्शक व नियमनबद्ध वाहतुकीच्या दृष्टीने महाराष्ट्र मोटार वाहन (शालेय बस) (प्रथम सुधारणा) नियम, २०२६ अधिसूचित केले असून हे नियम १६ जुलै रोजी राजपत्रात प्रसिद्ध झाले आहेत. सर्व शाळा व्यवस्थापन, शालेय बस/व्हॅन चालक, वाहन मालक व पालक यांनी या नियमांची नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहन परिवहन विभागाद्वारे करण्यात आले आहे.
या सुधारणांनुसार प्रमुख तरतुदी अशा आहेत. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणामार्फत शालेय वाहतूक भाडे निश्चित करण्यात येईल. शाळा परिवहन समितीला पालकांच्या तक्रारीचे निराकरण व त्रैमासिक अनुपालन अहवाल सादर करणे बंधनकारक राहील. चालक, महिला परिचारिका व इतर वाहतूक कर्मचाऱ्यांची लेखी नियुक्ती, पार्श्वभूमी पडताळणी व वैद्यकीय तपासणी अनिवार्य राहील. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन चढणे-उतरण्याची उपस्थिती नोंद ठेवणे आवश्यक राहील. पूर्व-प्राथमिक व इयत्ता पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक फेरीत महिला परिचारिका किंवा नियुक्त कर्मचारी असणे आवश्यक राहील. दिव्यांग व विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सहाय्याची व्यवस्था करणे आवश्यक राहील.
सर्व शालेय बस व व्हॅनमध्ये ऐआयएस - १४० मानकानुसार व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस व पॅनिक बटन, अग्निसुरक्षा व्यवस्था तसेच सर्व आसनांसाठी सीट बेल्ट अनिवार्य करण्यात आले आहेत. डिजिटल सुरक्षा प्रणाली, सिसिटिव्ही, लाईव्ह ट्रेकिंग, मोबाईल अँपद्वारे पालकांना माहिती उपलब्ध करून देऊन किमान ३० दिवसांचे सिसिटिव्ही फुटेज जतन करणे आवश्यक राहील. सर्व शाळा व वाहन चालकांनी या नियमांचे पालन राजपत्र प्रसिद्ध झाल्यापासून तीन महिन्यांच्या आत करणे आवश्यक असून, नियमांचे पालन न केल्यास संबंधित परवान्यावर निलंबन अथवा रद्द करण्याची कारवाई करण्यात येऊ शकते.
News - Nagpur




Petrol Price




